मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा झाल्या होत्या. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता दोन्ही परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. बारावीचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर होईलए अशी माहिती मिळत आहे. मात्र, दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटी जाहीर होऊ शकतो.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 13 हजार 909 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. बारावीची परीक्षा नऊ विभागीय मंडळांतर्फे आयोजित करण्यात आली होती. बारावीचा निकाल तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून येत्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो.
बारावीच्या परीक्षेचा निकाल येत्या आठवड्यात जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमकि परीक्षा मंडळ मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात निकाल जाहीर करु शकते. दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम बोर्डाकडून झाले आहे. आता निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च दरम्यान पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचे आयोजन केले जाते.
