रहिमतपूर : ज्ञानेश्वरी (Dnyaneshwari) हा जीवनाचे सोने (Gold) करणारा परीस आहे, तो मराठी संस्कृतीचा अमृतठेवा आहे. आपली संस्कृती (Culture) प्रकाश पूजक आहे. ती अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा, विकारातून विवेकाकडे जाण्याचा संदेश येते. पण अंधार दोन प्रकारचा असतो. सूर्य मावळल्यानंतर होणारा अंधार निसर्ग निर्मित, तर मूल्ये पायदळी तुडविल्यानंतर होणारा अंधार हा मानवनिर्मित असतो. हा मानवनिर्मित अंधार दूर करुन मानवधर्माची महती सांगण्यासाठी संत जन्माला आले. त्यांनी मांगल्याची आणि मानवतेची शिकवण दिली. रंजल्या-गांजल्या जीवांना आपुलकीने जवळ करणाऱ्या माणसात देव पहायला शिकविले, असे प्रतिपादन प्रा. यशवंत पाटणे यांनी केले.
तारगांव, ता कोरेगांव येथे सुवर्ण महोत्सवी पारायण सोहळ्यामध्ये प्रवचन सांगताना ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले .भिलार हे पुस्तकांचे गाव,कास हे फुलांचे गाव तर सुवर्ण महोत्सवी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामुळे तारगाव हे संतांचे गाव झाले आहे. संतांच्या गावात प्रेमाचा सुकाळ असतो. तिथे दुःखाचा लवलेश नसतो. भेदभाव नसतो. संतांनी समाजातील सर्व घटकांना प्रेमाच्या पवित्र धाग्याने एकत्र बांधणारी अध्यात्मिक लोकशाही दिली.
पण सध्या वाढता जातिधर्मद्वेष, अतिरेकी चंगळवाद आणि मूल्यहीन राजकारण यामुळे समाज जीवन व संस्कृती विस्कटत चालली आहे. अशा परिस्थितीत मानवी मनातील चैतन्य जागे करण्यासाठी ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रेरणा देतो. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मनाची मशागत करुन आपल्या वाट्याला अमृताची फळे देतो.
वारकरी संप्रदायात संताना माऊली म्हंटले जाते. त्याचे कारण संतांच्या ठायी आईसारखा सेवा, समर्पण आणि संयमी भाव असतो.
आम्हाला ज्ञानमाऊलीने जगण्याची जिद्द आणि संस्काराचे सामर्थ्य दिले. आजच्या काळात अविवेकाची काजळी दूर करण्यासाठी माऊलीच्या सदविचारांचा विवेकदीप मनात प्रज्वलित केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी तारगांव पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
