सातारा : ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंग, मारहाणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 17 रोजी रामराव नगर, गोडोली येथे वास्तव्यात असलेल्या एका महिलेस तिच्या पतीच्या मोबाईल वरून रात्री साडेआठ वाजता फोन आला. त्यावरून अनिकेत विश्वास साळुंखे, संतोष बबनराव शिंदे, ठाकरे गटाचे शहर प्रमुख शिवराज टोणपे, शैलेश नावडकर, डॉक्टर संजय ढाणे यांनी सांगितले की, तुमच्या नवऱ्याला पकडून बेदम मारले आहे. तुम्ही साईबाबा मंदिर, देशमुख हॉस्पिटल च्या समोर या. त्या अनुषंगाने संबंधित विवाहिता त्या ठिकाणी तिच्या दोन मुलींसह गेली असता वरील सर्वांनी तुमच्या पतीने आमच्याकडून एक करोड रुपये घेतले आहेत. आमचे पैसे कसे वसूल करून घ्यायचे, ते आम्हाला माहिती आहे, असे म्हणून तिच्या पतीचा मोबाईल, तिच्या पर्समध्ये ठेवलेला तिचा सॅमसंग कंपनीचा टॅब यांसह तिच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून काढून घेतले. तसेच महिलेसह तिच्या मुलींना हाताने, लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कपडे फाडून महिलेचा विनयभंग केला आहे. याच वेळी संतोष शिंदे यांची मैत्रीण (नाव माहित नाही) रा. सदर बाजार सातारा हिने मी पोलीस आहे, असे सांगून संबंधित महिलेचे केस ओढून तिला रस्त्यावरून ओढत नेले.
याप्रकरणी अनिकेत विश्वास साळुंखे, संतोष बबनराव शिंदे, शिवराज टोणपे, शैलेश नावडकर, डॉक्टर संजय ढाणे, संतोष शिंदे यांची मैत्रीण (नाव माहित नाही) आणि इतर अनोळखी चार ते पाच जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार संजय दिघे हे करीत आहेत.
