मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पाच टप्प्यातील एकूण 428 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. आता केवळ दोन टप्प्यातील मतदान (Voting) बाकी आहे. अशातच आता 4 जून रोजी महाराष्ट्रातील निकाल काय सांगणार, याबाबत राजकीय वर्तुळात चवीने चर्चा रंगू लागल्या आहेत. भाजपाला (BJP) 400 जागा मिळणार, की इंडिया आघाडीचे सरकार येणार, असे एक ना अनेक मुद्दे या चर्चांच्या केंद्रस्थानी आहेत. दरम्यान, याबाबत निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी विश्लेषन केलं आहे.
प्रशांत किशोर यांनी नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना 4 जून रोजीच्या निकालाबाबतही विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, 4 जून रोजी नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान बनतील. याचबरोबर 2019 प्रमाणे भाजपाला 300 किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील.
पुढे बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपाच्या जागा आणि मतांची टक्केवारी दोन्ही वाढताना दिसून येत आहे. दक्षिण पूर्व भागात भाजपाच्या 15 -20 जागा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर पश्चिम भागातही भाजपाचे फार काही नुकसान होईल, असं वाटत नाही.
लोकांमध्ये भाजपाविरोधात नाराजी असली हा राग निवडणूक कालावधीत व्यापक स्वरुपात दिसलेला नाही. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीचा निकाल बघितला तर भाजपाला 272 जागा मिळणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, यावेळी भाजपाच्या बाजुने दावे केले जात आहेत. 400 जागांच्या रणनीतीमुळे विरोधक पूर्णपणे फसले आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
जोपर्यंत इंडिया आघाडी सक्रीय झाली, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. ज्या जागांवर भाजपा कमजोर आहे, त्या जागांवर भाजपाने योजना बनवली. इंडिया आघडीची घोषणा झाल्यानंतर काही महिने त्याबाबत अनिश्चितता होती. त्यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचीदेखील घोषणा केली नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींविरोधात इंडिया आघाडीकडे सक्षम चेहरा नाही, असा समज जनतेत निर्माण झाला. त्याचा फायदा भाजपाला झाला, असं त्यांनी सांगितलं.
भारतात विरोधक कमजोर आहे, असा दावा केला जातो. मात्र हे सत्य नाही. सद्यस्थिती बघता, देशात विरोधक कमजोर आहे आणि मोदी सरकार सगळे खुश आहे, असं म्हणणं धाडसाचे ठरेल. आजपर्यंत देशपातळीवर कोणत्याही पक्षाला 50 टक्के मते मिळालेली नाही. विशेष म्हणजे जनतेने सत्ताधार्यांपेक्षा विरोधकांना जास्त मते दिली आहेत. ज्यावेळी या देशात सीएए-एनआरसी कायदा लागू करण्यात आला, त्यावेळी देशात विरोधापक्षांनी मोठ्या प्रमाणात आंदोलने केली. त्यामुळे देशात विरोधक नाहीत किंवा ते कमजोर आहे, असं म्हणणं चुकीचं आहे, असे ते म्हणाले.
