सातारा : येत्या शैक्षणिक वर्षापासून स्कूल व्हॅनच्या शुल्कात पाच टक्के वाढ होणार आहे. कोविडनंतर प्रथमच शुल्कात वाढ होणार असल्याने बहुतांश पालकांनी या दरवाढीला विरोध दर्शविणे तूर्तास टाळले आहे. इंधन दरवाढ, गाड्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ, वाहनांची देखभाल यासह अन्य कारणांमुळे शुल्क दरात वाढ केली आहे.
येत्या १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅनचालकांनी शुल्क दरात वाढ केली आहे. मागील काही महिन्यांपासून स्कूल व्हॅन चालक-मालकांना इंधन दरवाढ आणि इतर कारणांचा मोठा फटका बसला होता.
या पार्श्वभूमीवर टप्प्याटप्प्याच्या अंतराने शुल्कात वाढ केली आहे. या दरवाढीमुळे आधीच महागाईमुळे होरपळलेल्या नागरिकांना काही प्रमाणात आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. दरम्यान, शाळांमधून विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी नियमावलीचे तंतोतंत पालन केले जाते.
विद्यार्थ्यांची जबाबदारी ओळखून व्हॅन चालक काम करतात. जिल्ह्यात सुमारे दीड हजार स्कूल व्हॅन असून, शहरात सुमारे २०० ते २५० स्कूल व्हॅन आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील ८० सभासद विद्यार्थी सेवा संस्थेचे असून, उर्वरित संघटनांचे आहेत. यामधील आमच्या संघटनेने शुल्क वाढीचा निर्णय घेतल्याचे विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
वाहनांचा खर्च (स्कूल व्हॅनचालकांकडून)
- वाहनांचे पासिंग : २१ हजार रुपये
- देखभाल दुरुस्ती : पाच ते आठ हजार
- दोन वर्षांतून एकदा टायर बदलणे : दहा ते बारा १२ हजार रुपये
महागाई, इंधन दरवाढ झाली असतानाही दोन वर्षांपासून स्कूल व्हॅनच्या भाडे शुल्कात कुठलीही दरवाढ केली नाही. यंदा सरासरी ५० रुपये म्हणजे सुमारे पाच टक्के दरवाढ करण्याचा निर्णय आमच्या संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे. – उत्तम भोसले, अध्यक्ष, सातारा विद्यार्थी सेवा संस्था
दोन वर्षांनंतर वाढ…
कोविडच्या काळात दीड ते दोन वर्षे लॉकडाऊन असल्याने शाळा बंद होत्या. त्या काळात लॉकडाऊन असल्याने स्कूल बस गाड्या वाहतुकीशिवाय उभ्या होत्या. बस वाहतूक ठप्प असल्याने देखभाल खर्च वाढला होता. त्यानंतर सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर स्कूल व्हॅनचालकांनी म्हणजेच दोन वर्षांपूर्वी काही प्रमाणात वाढ केली होती. त्यानंतर दोन वर्षांपासून कुठलीही दरवाढ केली नसल्याने या वर्षी शुल्कात वाढ केली जाणार असल्याचे विद्यार्थी सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष दिलीप शिंदे यांनी सांगितले.
