Explore

Search

April 14, 2025 4:25 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune News : पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

आषाढीवारी सोहळ्याच्या तोंडावर भाविकांची होणार गैरसोय

आळंदी  : यंदाचा आषाढी पायीवारी सोहळा अवघ्या तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. अशातच जलप्रदूषणामुळे आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी रसायनयुक्त फेसाने फेसाळलेली आहे. आळंदीत वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी व पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्यातरी गटारीचे नसून पवित्र इंद्रायणी नदीचे आहे. पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील औद्योगिक कारखान्यांचे केमिकलयुक्त तसेच नदीकाठच्या गावातून मैलामिश्रित सांडपाणी प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदीपात्रात सोडले जात आहे. परिणामी आळंदीतील इंद्रायणीचे नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळले आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायनमिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्याखालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शींना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दूरगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोअर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लक्ष घालणार का? असा सवाल स्थानिक जनतेकडून उपस्थित होत आहे.

आळंदी हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येत्या २९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीत दाखल होऊन सोहळ्यानिमित्त पवित्र इंद्रायणीत स्नान करणार आहेत. विशेषतः अनेक भाविक नदीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करतात. मात्र सद्यस्थितीतील इंद्रायणीची अवस्था पाहता भाविकांनी स्नान किंवा पाणी प्राशन करावे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे. एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. तर दुसरीकडे राज्यसरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा, एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

आळंदीतील इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी राज्यसरकारकडे पाठपुरावा केला आहे. विशेषतः पावसाळी अधिवेशनात तारांकित व नागपुरातील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून स्थानिकांची व वारकऱ्यांची भूमिका खंबीरपणे मांडली आहे. यावर तत्काळ उपाययोजना करण्याची ग्वाही संबंधित मंत्रिमहोदयांनी दिली होती. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून कोणतेही उपाययोजना आखलेली नाही. त्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy