१० तोळं सोनं लंपास
सातारा : मराठी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेच्या घरी दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील घरी चोरी झाली आहे. यामध्ये चोरट्याने अभिनेत्रीच्या घरातील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. श्वेता शिंदेच्या घरातील तब्बल १० तोळं सोनं चोराने लंपास करत काही पैसे चोरल्याची माहिती मिळत आहे. चोरी केल्यानंतर चोराने घरातील कपाटही जाळल्याचं समोर आलं आहे. सोमवारी(३ जून) रात्री ही घटना घडली आहे. याबाबत अभिनेत्री श्वेता शिंदेने सातारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
श्वेता शिंदे तिच्या आईबरोबर साताऱ्यातील पिरवाडी या ठिकाणी राहते. कामाच्या निमित्ताने मुंबईला गेलेल्या श्वेता शिंदेच्या घरी चोरांनी दरोडा टाकला. माध्यमांशी बोलताना श्वेताने याबाबत माहिती दिली. “सोमवारी रात्री ३ जूनला माझ्या घरी दरोडा पडला. साधारणत: १० तोळे सोने आणि काही पैसे चोरले आहेत. नक्की किती मालमत्ता गेली ते माहीत नाही. पण, आईच्या जे काही लक्षात होतं ते तिने सांगितलं. नशीब त्यावेळी आई घरात नव्हती. त्यामुळे तिला काही झालं नाही. आताच मी डीसीपी साहेबांना भेटले. साताऱ्यातील पोलीस यंत्रणा सशक्त आहे. त्यामुळे नक्कीच यावर कारवाई होईल, असा मला विश्वास आहे,” असं श्वेताने सांगितलं.
