Explore

Search

April 19, 2025 6:11 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara Chhatrapati Udayanraj News : लोकशाहीत जनता जनार्दनच राजा!

श्री. छ. उदयनराजेंची कृतज्ञता; विजयानंतर मानले सर्वांचे आभार

सातारा :  सातारा लोकसभा मतदारसंघातून मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मतदारांसह निवडणुकीसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात छत्रपती उदयनराजे यांनी एक पत्र लिहिले असून, लोकशाहीत जनता जनार्दनच राजा असल्याचा उल्लेख त्यांनी त्यात केला आहे.

छत्रपती उदयनराजेंनी म्हटले आहे, “प्रत्येक निवडणूक ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची कसोटी असते. आपल्या नेत्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे कार्यकर्तेच खऱ्या अर्थाने निवडणूक लढवत असतात. जय किंवा पराजय हाच कोणत्याही परीक्षेचा, युद्धाचा आणि निवडणुकीचा अंतिम परिणाम असतो. परंतु त्याची पर्वा न करता नेत्याची आणि पक्षाची सावलीसारखी पाठराखण करणारे जिवाभावाचे कार्यकर्ते हीच नेत्याची खरी ताकद असते. सुदैवाने मला असे हजारो सवंगडी पहिल्यापासून लाभले. त्यांच्या सोबतीने जीवनातील प्रत्येक चढउतार सुकर केला. या मंडळींनी सर्व उन्हाळे-पावसाळे माझ्यासोबत पाहिले. कधी गुलाल उधळला तर कधी अश्रू पुसले. यातील एकाही क्षणाचे विस्मरण मला आजन्म होणार नाही.”

आपल्यावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानताना छत्रपती उदयनराजे म्हणतात, “पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, केंद्रीय गृहमंत्री मा. श्री. अमितभाई शाह यांनी माझ्यावर विश्वास दाखविला. वास्तविक, त्यांनी हा विश्वास आमच्याबरोबरच तुम्हा सर्वांवर दाखविला. उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेन्द्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी हरघडी मला पाठिंबा देऊन वेळोवेळी सहकार्य केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या ज्येष्ठ नेत्यांसह पक्षाचे तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, आरपीआय, रासपसह महायुतीच्या घटकपक्षांचे सर्व आमदार, माजी आमदार, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य आदी सर्वांनी निवडणूक जाहीर झाल्यापासूनच माझे हात बळकट केले.”

लोकशाहीत नेता हा विश्वस्त, मार्गदर्शक आणि प्रतिनिधी असतो; परंतु जनता जनार्दनच खरा राजा असतो, असा उल्लेख करून छत्रपती उदयनराजे म्हणतात, “छत्रपती शिवरायांची शिकवण, न्यायप्रियता आणि सर्वधर्म समभावाचा वारसा घेऊन मी समाजकारणात पाऊल ठेवल्यापासून जनता जनार्दनाने माझ्यावर उदंड प्रेम केले. या प्रेमाची उतराई सोडाच; वर्णनसुद्धा शब्दांनी होणे शक्य नाही. तथापि, यशाच्या या घडीला त्या अलोट प्रेमाची आठवण करणे आवश्यक आहे. या यशाने मला केवळ आनंदच नव्हे तर त्यासोबत जबाबदारीची जाणीवही पुन्हा एकदा करून दिली आहे. ती जाणीव माझ्या मनात सदैव राहील याची खात्री बाळगा. प्रत्येक पाऊल उचलताना, प्रत्येक निर्णय घेताना, प्रत्येक वेळी भूमिका घेताना हे प्रेमच मला शक्ती देईल, असा विश्वास वाटतो.”

दिल्लीहून परतताच दौरा!

मतदारांचे आभार मानण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी विजयानंतर लगेच मतदारसंघात दौरा करण्याचे निश्चित केले होते. तथापि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांची बैठक पक्षाने बोलावल्यामुळे तातडीने दिल्लीला रवाना होत आहेत. दिल्लीहून ते परतताच मतदारसंघाचा दौरा करणार असून, दौऱ्याचा कार्यक्रम आधी जाहीर करण्यात येईल, असे छत्रपती उदयनराजेंच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy