मुंबई : शिंदे गटाचे पाच ते सहा आमदार संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निकालाच्या नंतर शिंदे गटातील तटस्थ पाच ते सहा आमदारांनी ठाकरेंशी संपर्क केल्याचं सांगण्यात आलं आहे. ठाकरेंच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पाच ते सहा आमदार पुन्हा ठाकरेंकडे येण्याची इच्छा ठेवून आहेत. लोकसभेच्या निकालानंतर या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याची माहिती आहे. ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जे आमदार शिंदे गटात गेले आणि त्यांनी टोकाची भाषा वापरली नाही. ते अनेकदा तटस्थ राहिले. त्यांना पुन्हा ठाकरे गटात घेण्याचा विचार केला जात आहे.
शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. तब्बल ४० आमदारांना घेऊन शिंदे बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात महायुतीचे सरकार स्थापन केले होते. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे गटात गेलेले अनेक नेते अस्वस्थ झालेले आहेत. अनेक नेत्यांनी उघडउघड भाजपमधील नेत्यांना बोल लावले आहेत. यापार्श्वभूमीवर सूत्रांनी दिलेल्या या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
माहितीनुसार, यात मुंबईतील काही आमदार आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एक आमदार घरवापसी करण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसात याबाबत मोठी घडामोड घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होईल. त्याआधीच अनेक नेत्यांचा पक्षबदल होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाचा कल बदलताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. अजित पवार गटाला लोकसभेमध्ये एक जागा जिंकता आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारली आहे. काल झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीला सहा आमदार विविध कारणामुळे गैरहजर होते. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.
