सातारा शहर डीबी ची कारवाई
सातारा : येथील कुख्यात गुंड अजय उर्फ लल्लन दत्तात्रय जाधव याच्या टोळीतील मोक्का (Mokka) मधील पसार असलेल्या मच्छिंद्र उर्फ टकल्या भागवत बोराटे (वय 32, रा. प्रतापसिंहनगर सातारा) याला अटक (Arrest) करण्यात आली आहे. सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने ही कारवाई केली.
प्रतापसिंहनगर खेड येथील कुख्यात गुंड अजय उर्फ लल्लन जाधव याने त्याच्या टोळीसोबत प्रतापसिंहनगर येथे एका कुटुंबियांवर हल्ला करत वाहनांची प्रचंड तोडफोड केली होती. या घटनेने प्रतापसिंहनगर हादरून गेले होते.
हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने गुन्हा दाखल होताच संशयित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली. मुख्य संशयित आरोपीसह बहुतेकांना अटक केली. मात्र टकल्या बोराटे हा पसार होता. सातारा शहर पोलीस त्याच्या शोधात होते. संशयिताची माहिती डीबीच्या पथकाला मिळाली. संशयित हा पाचगणी, महाबळेश्वर येथे निघून गेला असल्याची व तो स्वतःची ओळख लपवून वावरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. दोन दिवस शोध घेवून त्यास महाबळेश्वर येथून शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत पोनि राजेंद्र मस्के यांचे मार्गदर्शनाखाली फौजदार सुधीर मोरे, पोलीस निलेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला.
