Explore

Search

April 19, 2025 6:11 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Banking : विकसकांना एकाच बँकेत वेगवेगळी तीन खाती बंधनकारक

सातारा : विकसकाने ग्राहकांकडून घेतलेले पैसे इतरत्र वापरू नयेत, प्रकल्पावर केल्या जाणाऱ्या पैशाचा हिशेब चोखपणे ठेवला जावा, यासाठी विकसकाने आपल्या प्रकल्पाच्या नावाने एकाच बँकेत तीन वेगवेगळी खाती काढून निधी खर्च करावा, त्याचा हिशेब ठेवावा, असे निर्देश महारेराने दिले आहेत. याची अंमलबजावणी एक जुलैपासून सुरू झाली आहे. त्यामुळे आता ग्राहकाने केलेली गुंतवणूक सुरक्षित राहणार असून, आर्थिक अडचणींशिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकेल.

सदनिकेची नोंदणी करताना विकसक सध्या सदनिकेशिवाय पार्किंग, क्लब, मनोरंजन केंद्र किंवा अशा विविध सोयीसुविधांसाठी वेगवेगळ्या नावाने धनादेश घेऊन ते विविध बँकेत जमा करतात. त्यामुळे घर खरेदीदाराने सदनिका नोंदणी आणि इतर बाबींसाठी प्रवर्तकाला एकूण किती पैसे दिले, हे एकत्रितपणे कुठेच दिसत नाही.

स्थावर संपदा अधिनियमानुसार ग्राहकांकडून आलेल्या रकमेपैकी त्या प्रकल्पाचे बांधकाम आणि भूखंडासाठी लागणारी ७० टक्के रक्कम स्वतंत्र खात्यात ठेवणे आवश्यक आहे. मात्र, इतर घटकांसाठी घेतलेली रक्कम कुठेच दिसत नाही. त्याचा फायदा घेत विकसक ग्राहकांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्याची गंभीर दखल घरखरेदीदारांकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व पैशांचा हिशेब पूर्णपणे उपलब्ध असावा, यासाठी एकाच बँकेत प्रकल्पाची तीन पदनिर्देशित खाती काढण्याबाबतचे निर्देश जारी केले आहेत. एवढेच नाही तर ज्या खात्यात घरखरेदीदाराने पैसे जमा करायचे, त्या खात्याचा क्रमांक विक्री करारात आणि सदनिका नोंदणी पत्रात नमूद करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

खर्चाची चौकट

आर्थिक व्यवहारात शिस्त, अनुपालनाची हमी, कार्यक्षमता, पारदर्शकता, जबाबदेयता व समानता येऊन या खात्यांचा कायदेशीर चौकटीतच संचलन आणि वापर व्हावा, यासाठी महारेराने खर्चाची चौकट घालून दिली आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पदनिर्देशित खाते निर्मितीचा हा निर्णय घेतला आहे.

या खात्यांवर टाच नाही

व्यवहार खाते हे विकसकाचे खाते राहणार असून, जमीन, बांधकामाशिवाय प्रकल्पाशी संबंधित इतर खर्चासाठी वापरायचे आहे. संकलन आणि विभक्त खात्यांवर कुठलाही तिसऱ्या पक्षाचा हक्क राहणार नाही. कुठल्याही यंत्रणांकडून खात्यांवर टाच येणार नाही, याची काळजी बँकेने घ्यायची आहे.

खात्याच्या वापरावर मर्यादा

नोंदणीकृत प्रकल्प पूर्ण होण्याच्या तारखेला या खात्यातील सर्व व्यवहार बँकेला थांबवावे लागतील. प्रकल्पाला महारेराने मुदतवाढ दिल्याशिवाय त्या खात्याचा वापर करता येणार नाही. विकसकाला प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगीशिवाय बँक खाते बदलता येणार नाही.

लेखापाल, अभियंता, वास्तुविशारदची परवानगी

घरखरेदीदारांनी नोंदणी केलेल्या प्रकल्पातील पैसा एकाच खात्यात जमा होईल. विक्रीकरारात व नोंदणीपत्रात खात्यांचा आणि रकमांचा उल्लेख राहील. प्रकल्प सनदी लेखापाल, अभियंता आणि वास्तुशास्त्रज्ञ यांच्या प्रमाणपत्राच्या प्रमाणानुसारच पैसा काढता येईल. एकापेक्षा जास्त प्रवर्तक असल्यास त्यांचीही जबाबदारी उभयमान्य तरतुदीनुसार राहणार आहे. ही तरतूद पहिल्यांदाच करण्यात आलेली आहे.

एकाच नावाने धनादेश देता येणार

आतापर्यंत विकसक ग्राहकांकडून वेगवेगळ्या नावाने धनादेश घेऊन ते पैसे वेगवेगळ्या खात्यावर फिरवत असे. त्याचा शोध घेता येत नव्हता; पण आता घरखरेदीदार एकाच नावाने धनादेश देऊ शकणार आहे. त्यामुळे सदरची रक्कम एकाच खात्यात जाऊन ती संबंधित गृह प्रकल्पावर खर्च करावी लागणार आहे.

त्यामुळे ग्राहकांना घर वेळेत मिळणार आहे, तसेच पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या नावाने धनादेश द्यावे लागणार नाहीत. ज्यामुळे गैरव्यवहाराला आळा बसून घरखरेदीदारांचे हित अधिक सुरक्षित आणि संरक्षित होईल. गृहनिर्माण प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहारात अंगभूत शिस्त निर्माण होईल.

अशी असतील तीन बँक खाती

  • महारेराने ग्राहकांकडून आलेल्या सर्व पैशांसाठी विकसकांनी एकाच बँकेत तीन खाती काढणे बंधनकारक केले आहे.
  • महारेरा पदनिर्देशित संकलन खाते – या खात्यात प्रकल्पाची आणि ग्राहकांकडून येणारी सर्व रक्कम जमा करावी लागणार आहे.
  • महारेरा पदनिर्देशित विभक्त खाते – यामध्ये जमीन आणि बांधकामांसाठी ७० टक्के रक्कम ठेवावी लागणार आहे.
  • महारेरा पदनिर्देशित व्यवहार खाते – या खात्यात विकसकाने जमीन, बांधकाम खर्चाशिवाय इतर प्रकारच्या खर्चाची ३० टक्के रक्कम ठेवावी लागणार आहे.

रेराचा निर्णय स्वागतार्ह असून, ग्राहक ते विकसक यांच्यामध्ये पारदर्शकता टिकून राहण्यास मदत होईल. रेराच्या नियमानुसार ग्राहकांचे कर्ज ज्या बँकेत असेल, त्या बँका रेराला दिलेल्या विकसकच्या अकाउंटलाच पैसे आधीपासून देत होत्या व आहेत. त्याच पद्धतीने आमचेही काम आधीपासून सुरू आहे. नियमाप्रमाणे काम न करणाऱ्यांना या नियमामुळे चाप बसेल. – श्रीधर कंग्राळकर, कंग्राळकर असोसिएशन

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy