एक लाख ३२ हजार नोंदींपैकी फक्त ३७३५ प्रमाणपत्रांचे वितरण
सातारा : मराठा समाजाला कुणबी दाखले मिळावेत, यासाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यात कुणबी नोंदणींचा शोध सुरू केला. सध्या या नोंदींचा शोध घेण्याची प्रक्रिया थंडावली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ६३८ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापद्धतीने मागणी करेल त्यांना कुणबी मराठा व मराठा कुणबी असे जातीचे दाखले देण्याचे काम सुरू आहे.
आता केवळ शैक्षणिक, नोकरी व निवडणुकीच्या कामासाठी कुणबी जातीच्या दाखल्याची जात पडताळणी करून मिळत आहे. अद्याप अनेक गावांतील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडलेल्या नाहीत. त्यातच नोंदी शोधण्याचे कामही थंडावल्यामुळे मराठा समाजात अस्वस्थता पसरली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी मराठा व मराठा कुणबीच्या जुन्या नोंदी शोधून काढून त्यानुसार अशा नोंदी सापडणाऱ्या मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्याबाबत शासनाने कार्यवाही करण्याची सूचना केली होती.
त्यानुसार शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कुणबीच्या नोंदींचा शोध सुरू केला. सुरुवातीला हे काम जलद गतीने व गांभीर्याने झाले; पण आता ही शोधमोहीम जवळजवळ थंडावली आहे. त्यामुळे नोंदी सापडत नसल्याने अनेक गावांतील मराठा समाजाला कुणबीतून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.
जिल्हा प्रशासनाच्या १२ विभागांनी शोध मोहीम राबवून एकूण एक लाख ३४ हजार, ६३८ नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीचे स्कॅनिंग करण्याचे काम एक लाख १९ हजार ६३४ नोंदींचे पूर्ण झाले आहे, तर जिल्ह्याच्या संकेतस्थळावर आतापर्यंत एक लाख १२ हजार ०७५ नोंदी अपलोड झाल्या आहेत. सध्या कुणबी मराठा व मराठा कुणबीच्या नोंदींचा शोध घेण्याचे काम पूर्णपणे बंद झाले आहे.
त्यामुळे आणखी काही कागदपत्रे तपासणी केल्यास मराठा समाजाला त्याचा कुणबी जात प्रमाणपत्र काढता येणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात तरी कुणबी नोंदी शोधाला गती मिळायला हवी, अशी अपेक्षा मराठा समाजातून व्यक्त होत आहे.
७१६ प्रकरणे प्रलंबित
मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबर २०२३ पासून आजअखेरपर्यंत चार हजार ४५५ जातप्रमाणपत्रे तयार करण्यात आली आहेत. त्यापैकी तीन हजार ७३५ जात प्रमाणपत्रे वितरित केली आहेत, तर चार अर्ज नामंजूर झाले असून, ७१६ प्रकरणे प्रलंबित आहेत.
दृष्टिक्षेपात
1) जिल्हा प्रशासनाकडून १२ विभागांच्या माध्यमातून कुणबी नोंदींचा शोध
2) सुमारे २५ लाख नोंदींची तपासणी
3) १९४८ ते १९६७ पर्यंतच्या सात लाख ९५ हजार ८६५ नोंदीची तपासणी
4) १९४८ पूर्वीच्या ११ लाख २३ हजार ४५० नोंदींची तपासणी
5) यामध्ये ४० हजार ९०९ कुणबी मराठा व मराठा कुणबीच्या नोंदी सापडल्या आहेत.
