सातारा : शाळा भरण्याची आणि सुटण्याची वेळ म्हणजे रस्त्यावर वाहतूक कोंडी ही ठरलेली. मात्र, ही कोंडी अनेकांच्या अंगवळणी पडल्याने कोणी त्यावर ब्र काढण्यास तयार होत नाही. जिल्ह्यात जवळपास सर्वच शाळा परिसरांत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली असल्याने यात विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. कोंडीतून वाट काढताना सायकलवरून अथवा चालत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते दिव्य ठरावे, अशी स्थिती अनेकदा असते.
वाहतूक कोंडीमुळे प्रवासास वेळ लागून वादावादीचे प्रकार वाढत आहे. त्याचबरोबर इंधन मोठ्या प्रमाणावर जळून ध्वनी, वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. या कोडींचा परिसरातील नागरिक, व्यावसायिकांना त्रास होत असल्याने यावर उपाययोजना राबविण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, शाळा व्यवस्थापन समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
साताऱ्यात प्रभावी वाहतूक आराखडा राबवावा :
राजपथावर तसेच लगतच्या परिसरात अनेक शाळा आहेत. या शाळांमध्ये परिसरातील हजारो विद्यार्थी येत असतात. त्यांना सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी येणारे पालक, त्यांची वाहने, रिक्षा, स्कूलबसची यामुळे शालेय कामकाजाच्या दिवशी सर्वच शाळा परिसरात वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा त्रास समाजातील सर्वच घटकांना दररोज सहन करावा लागतो. हा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी वाहतूक आराखडा तयार करणे आवश्यक आहे.
रयत शिक्षण संस्थेचा परिसर, महाराजा सयाजीराव विद्यालय, कन्याशाळा, न्यू इंग्लिश स्कूल, नवीन मराठी शाळा, अनंत इंग्लिश स्कूल, हत्तीखाना, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, वायसी कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज, डी.जी. कॉलेज, भवानी शाळा, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयासह इतर अनेक शाळा, महाविद्यालये, खासगी शिक्षण संस्था, क्लासेस, ॲकॅडमींमुळे साताऱ्याची ओळख शैक्षणिक जगतात सर्वदूर आहे.
शहरातील सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये शहरासह परिसरातील गावांमधील हजारो विद्यार्थी येत असतात. मुलांना शाळेत वेळेत सोडण्यासाठी आणि तिथून पुन्हा घरी नेण्यासाठी पालकांची तसेच त्यासाठी कार्यरत असणाऱ्या इतर खासगी यंत्रणांची मोठी तारांबळ यामुळे उडत असते. या तारांबळीतूनच वाहने अस्ताव्यस्त लावण्याचे प्रकार होऊन त्याची परिणीती वाहतूक कोंडीत होते.
शहर पोलिसांकडून उपाययोजना सुरू :
साताऱ्यातील शाळा परिसरात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना त्यासाठीच्या सूचना केल्या आहेत. यात वाहने रस्त्याऐवजी शाळा आवारात लावण्याच्या महत्त्वाच्या सूचनेचा समावेश आहे. याच अनुषंगाने प्रादेशिक परिवहन विभागानेही आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याच्या सूचना शालेय व्यवस्थापन समितीस करण्यास सुरुवात केली आहे.
