एक महिलेचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी
कराड : देवदर्शनाहून परतताना कराड-शेडगेवाडी रस्त्यावरील ओंड येथे चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात एक महिलेचा मृत्यू, तर पाच जण गंभीर जखमी झाले. काल पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. जयश्री संतोष मोरे (वय ४२, रा. होम समर्थ सोसायटी, सानपाडा, सेक्टर पाच, नवी मुंबई) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
तर संतोष शंकर मोरे (रा. सानपाडा, सेक्टर पाच, नवी मुंबई), विकास वसंत भोसले (रा. भांडूप, मुंबई), शैला संजय कदम, माधुरी लोंढे (दोघीही रा. कुर्ला, मुंबई) व गिरीश सूर्यकांत गुहागरकर (रा. विक्रोळी, मुंबई) हे जखमी झाले आहेत. दरम्यान, याबाबत संतोष मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक गिरीश गुहागरकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील संतोष मोरे हे पत्नी जयश्री यांच्यासह इतरांसोबत कारने गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्वजण रात्री पुन्हा मुंबईला जाण्यासाठी शेडगेवाडी ते कराड मार्गाने कराडकडे येत होते. गिरीश गुहागरकर हा कार चालवीत होता.
काल पहाटे सहाच्या सुमारास ओंड गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन रस्त्यानजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. त्यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच जयश्री मोरे यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
