नवी दिल्ली : पॅरिस येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतून भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आणखी एक पदक मिळालय. आज ऑलिम्पिक स्पर्धेचा चौथा दिवस आहे. भारताला दुसर पदकही नेमबाजीत मिळालय. मनु भाकरने इतिहास रचलाय. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं पदकं 10 मीटर एअर पिस्टल मिश्र दुहेरीत मिळालय. मनु भाकर आणि सरबज्योत सिंग जोडीला हे कांस्य पदक मिळालय. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत 2 पदक मिळवणारी मनू पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून देणारी मनू भाकर पहिली भारतीय ठरली होती.
मनु भाकरने याआधी 28 जुलैला पॅरिस ऑलिम्पिकच्या 10 मीटर एयर पिस्तुल सिंगल्स इवेंटमध्ये ब्रॉन्ज मेडलवर नेम साधला होता. पॅरिसमध्ये जिंकलेल्या पहिल्या ब्रॉन्जसह मनुने मेडल टॅलीमध्ये भारताच खात उघडलय. पॅरिसमध्ये मिळालेल्या पहिल्या यशानंतर 48 तासानंतर मनु भाकरने आणखी एक ब्रॉन्ज जिंकून इतिहास रचला आहे.
कोरियाने पहिला सेट जिंकला
ब्रॉन्ज मेडल मॅचमध्ये कोरियाई जोडीसोबत मनु आणि सरबजोतचा सामना सोपा नव्हता. या मॅचच्या सुरुवातीला कोरियाने पहिला सेट जिंकला. त्यानंतर सलग 5 सेट मनु आणि सरबजोतने जिंकले. कोरियाने पुन्हा मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण मनु आणि सरबजोतच्या एकाग्रतेने त्यांना यशस्वी होऊ दिलं नाही. अखेर मेडल भारताने जिंकलं.
20 परफेक्ट शॉट
याआधी मनु भाकर आणि सरबजोत सिंहने 29 जुलैला 10 मीटर एयर पिस्तुल मिक्स्ड टीम इवेंटमध्ये ब्रॉन्ज मेडल मॅचसाठी क्वालिफाय केलं होतं. दोघांनी क्वालिफिकेशन राऊंडमध्ये 20 परफेक्ट शॉट मारले होते. त्यातून 580 गुणांची कमाई केलेली.
टोक्योची कसर पॅरिसमध्ये भरुन काढली
पॅरिसमध्ये मनु भाकर आपलं दुसरं ऑलिम्पिक खेळतेय. याआधी टोक्योमध्ये मनू भाकरने डेब्यु केलेला. त्यावेळी मनूला पदक विजेती कामगिरी करता आली नव्हती. टोक्योमध्ये मनु भाकरच अपयश तिचा खराब खेळ नाही, पिस्तुलमध्ये तांत्रिक बिघाड होता. टोक्योमधील अपयशानंतर मनुला बरीच टीका सहन करावी लागली होती. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने ती कसर भरुन काढली. पॅरिसमध्ये मनुने स्वत:सोबत भारताच्या पदकाच खातं उघडलं.
