शिवसेना उबाठा गटाकडून पालिकेला अनोख्या आंदोलनाचा इशारा
सातारा : सातारा पालिका बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभाराचा मंगळवारी उबाठा ठाकरे गटाच्या वतीने पालिकेत निषेध करण्यात आला. सातारा शहरातील खड्डे तातडीने बुजवा अन्यथा शहरात पालिकेच्या सहकार्याने राज्यस्तरिय गोट्या खेळणे स्पर्धा आयोजित करण्यात येईल, असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी दिला.
सचिन मोहिते यांच्यासह सेनेच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सातारा पालिका उपनगराध्यक्ष अरविंद दामले यांची भेट घेतली. यावेळी बांधकाम विभागाचे प्रभारी अभियंता दिलीप चिद्रे उपस्थित होते. सातार्यातील खड्डे पडलेल्या रस्त्यांबद्दल शिवसैनिकांनी चिद्रे यांना जाब विचारला. तसेच सातारा पालिका शाळांच्या स्वच्छतागृहांना दारे कशी नाहीत, असा सवाल करण्यात आला. या सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.
या आंदोलनाविषयी बोलताना सचिन मोहिते म्हणाले, सातारा शहरातील सर्वच्या सर्व रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून नुकतीच 2 महिन्यात झालेली रस्त्याच्या कामात देखील मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. या सर्वच कामांचे ऑडिट होणे गरजेचे आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणारे ठेकेदार आणि अभियंता यांच्या त्वरित कार्यवाही व्हावी, तसेच कचर्याची समस्या जागोजागी दिसत असून उपनगरात त्याचे प्रमाण जास्त आहे. सध्या साथीचे आजार मोठ्या स्वरूपात पसरले असून घंटा गाडी सुद्धा बर्याच ठिकाणी एक दिवसाआड, दोन दिवस आड करून येत असल्याने घरातच कचरा साठवून ठेवावा लागत आहे. यामुळे नागरिक फार त्रस्त झालेले आहेत. यावर त्वरित उपाय योजना झाल्या नाहीत तर शिवसेनेच्या वतीने रस्त्यावर राज्यस्तरीय गोट्या खेळण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. या स्पर्धा नगर पालिकेच्या हद्दीतील सर्व रस्त्यांवर आयोजित करण्यात येणार आहेत. त्याच सोबत लवकरच सर्व कचरा गोळा करून नगरपालिकेच्या आवारात व आरोग्य विभागाच्या अधिकारी यांच्या घरा समोर शिवसेना जमा करणार आहे. येत्या दहा दिवसात ही कार्यवाही केली जाणार असल्याचा इशारा मोहिते यांनी दिला.
या प्रसंगी शिव आरोग्य सेनेचे निमिष शहा, सादिक बागवान, प्रणव सावंत, सागर रायते, सुनील पवार, सागर धोत्रे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अमोल गोसावी, आरिफ शेख, आझाद शेख, युवा सेनेचे निलेश चव्हाण, दादा फल्ले, अजय सावंत, इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
