Explore

Search

April 18, 2025 3:24 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara selfie Accident : सेल्फीचा नाद पडला भारी!

पुण्यातील तरुणी कोसळली दरीत

सातारा : सातारा-ठोसेघर रस्त्यावरील बोरणे घाटात गाडी उभी करून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पुण्यातील २९ वर्षांची तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली. यामध्ये संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली.

नसरीन अमीर कुरेशी (वय २९, रा. वारजे, पुणे), असे दरीत पडून जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. साताऱ्यातील संगमनगरमध्ये पुण्यातील दोन मुली व तीन मुले चारचाकीने आले होते. त्यानंतर दुपारी सर्वजण ठोसेघरला फिरण्यासाठी गेले होते. परंतु ठोसेघर धबधबा बंद असल्याने सर्वजण परत यायला निघाले. बोरणे घाटात आल्यानंतर सर्वजण गाडीतून खाली उतरले. त्यानंतर फोटोसेशन सुरू झालं. रस्त्याच्याकडेला उभे राहून फोटो काढत असताना अचानक तोल गेल्याने तरुणी पन्नास फूट खोल दरीत पडली. याची माहिती त्या मुलांनी सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी होमगार्ड तसेच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सच्या जवानांना याची माहिती दिली. पोलिस तसेच ट्रेकर्स आणि होमगार्डच्या जवानांनी तातडीने बोरणे घाटात जाऊन मदतकार्य सुरू केलं. होमगार्ड अभिजित मांडवे यांनी दरीत उतरून तरुणीला दोरीच्या साह्याने सेफ्टी बेल्ट लावून दरीतून बाहेर काढले. संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अतिदक्षता विभागामध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची अद्याप नोंद झाली नव्हती.

फोटोच्या धुंदीत जातोय ‘तोल’
बोरणे घाट किंवा कास रस्त्यावरील घाटात जाताना अनेक पर्यटक आपल्या गाड्या थांबवून रस्त्याच्या कट्ट्यावर उभे राहून सेल्फी घेताना किंवा एकमेकांचे फोटो काढताना दिसतात. या पर्यटकांवर आता कारवाई होणे गरजेचे आहे. फोटोच्या धुंदीत कधी पाय घसरतो, हे समजतही नाही. ठोसेघर अथवा वजराई धबधबा परिसरात बंदी असतानाही अनेक पर्यटक हुल्लडबाजी करताना पोलिसांना दिसून येत आहेत. आतापर्यंत दोन पर्यटकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, तरी सुद्धा पर्यटकांची हुल्लडबाजी सुरूच आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy