सातारा : येथील रामकृष्ण सेवा मंडळातर्फे गेल्या तीस वर्षांपासून दरवर्षी अभावग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय वाटप करण्यात येते. दरवर्षीप्रमाणेही यावर्षी श्री रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीत साहित्य वाटप करण्यात आले. श्रीरामकृष्ण सेवा मंडळ सातारा तर्फे ‘शिवभावे जीवसेवा’ या तत्वाने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. मंडळातर्फे दरवर्षी दानशूरांना मदतीचे आवाहन करण्यात येते, त्यातून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यावर्षीही मंडळाने केलेल्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. दानशूरांकडून आलेल्या देणगीमधून अभावग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेशाचा वाटपचा नुकताच मान्यवरांच्या हस्ते झाला.
यावर्षी नगरपालिका शाळा क्रमांक एक दोन, सात न्यू इंग्लिश स्कूल व कन्याशाळा मधील ७५ विद्यार्थी तसेच रामकृष्ण सेवा मंडळाच्या बालक संघातील २४ विद्यार्थी अशा १०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. शालेय साहित्यामध्ये गणवेश, दप्तर, पेन, पेन्सिल, खोड रबर, वहया, छत्री रेनकोट इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रामकृष्ण मठ नागपूरचे स्वामी ज्ञानमूर्ती आनंद महाराज, उद्योजक सयाजी चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, माजी शिक्षणाधिकारी राजकुमार निकम, मंडळाचे अध्यक्ष रमण भाई शहा यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी साहित्याचे पूजन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत झाल्यावर भजन गाना ने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी रामकृष्ण सेवा मंडळाच्या कार्याचे कौतुक करत यापुढे सेवा मंडळाच्या सर्व सेवाकार्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. उद्योजक सयाजी चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मंडळाचे कार्यवाह प्रसाद पवार यांनी केले. आभार राजकुमार निकम यांनी मांडले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले. यावेळी हेमंत गुजर, सुरेश कोकरे, सुजित कुलकर्णी, मंडळाचे कार्यकर्ते पदाधिकारी, शिक्षक वर्ग उपस्थित होता.
