Explore

Search

April 19, 2025 8:01 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या नावाने अध्यासन व्हावे

साहित्यिक अरुण जावळे यांची मागणी

सातारा : माणसाच्या जगण्याचा आणि जीवनाचा सरनामा हा विज्ञाननिष्ठ असला पाहिजे. त्याशिवाय अनिष्ट रूढी, भाकड प्रथा, परंपरा यांच्या  सांस्कृतिक व धार्मिक गुलामगिरीतून माणूस मुक्त होणार नाही, अशी उभ्या महाराष्ट्राला हाक देणारा विवेकवादी सुधारक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने महाराष्ट्र स्तरावर एक अध्यासन केंद्र आणि सातारा शहरात पूर्णाकृती पुतळा उभा करावा, अशी आग्रही मागणी साहित्यिक अरुण जावळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. यासंबंधी मूख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध विद्यापीठाच्या कुलगुरुंचीही भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ नरेद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे महाराष्ट्रात भरीव कार्य केले आहे. बुद्धाने प्रतिपादलेले बुद्धिप्रामाण्यवाद, प्रतित्यसमुत्पाद आणि अनित्यवाद हे अजरामर सिद्धांत जनमाणसांत रुजविण्याची चळवळ त्यांनी गावागावात राबवलीय. खरतरं, डॉक्टरांच्या बलिदानामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला. त्यामुळे आज भोंदुगिरी आणि बुवाबाजी करणाऱ्या वृत्तींना चाफ बसला आहे. विशेषतः धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली ज्या प्रवृत्ती समस्त स्त्रियांसह लहान मुलांचे मानसिक आणि शारीरिक शोषण करत होती त्या प्रवृत्तीही गारद झाल्या आहेत.

डॉ. दाभोलकर सरांचे हे कार्य म्हणजे शोषणमुक्त आणि अंधश्रद्धामुक्त महाराष्ट्राचे एक सुंदर विचारशिल्प आहे. या विचारशिल्पाचे चिरंतन स्मरण राहण्यासाठी आणि अवघी महाराष्ट्रभूमी विज्ञानिष्ठ बनविण्यासाठी डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या नावाने महाराष्ट्र सरकारने पुणे, मुंबईसह महाराष्ट्रभरातील सर्व विद्यापीठात अध्यासन केंद्र उभारावे. ज्यामधून धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली भारतीय समाजाचे कशा पद्धतीने शोषण होत आले यावर चिंतन होईल हे पाहिले जाईल. कोणकोणत्या विचारप्रवाहांनी इथली समाजव्यवस्था अंधश्रद्धेच्या गर्तेत ओढली गेली आणि या साऱ्याचा एकूणच भारतीय समाज मनावर काय परिणाम झाला. तसेच कशा पद्धतीने सांस्कृतिक नुकसान होत आले यावरही विशेषत्वाने या केंद्रात अभ्यास व संशोधन होईल.

अवघं जग हे विज्ञानावर चालते आहे. कार्यकारणभाव आणि विवेकवाद यांच्या आधारावर जगाचे संचलन सुरुं आहे, हे धडधडीत आणि शाश्वत सत्य असताना भारतभूमी मात्र आजही अज्ञान आणि अंधश्रद्ध अवस्थेत गाढ झोपी गेलेली आहे. माणूस शिक्षित होतोय, परंतु अंधश्रद्धेतून बाहेर कसे यावे हे त्याला उमजत नाही. म्हणजेच तो शिक्षित होऊनही विज्ञानिष्ठ होत नाही, ही खरेतर एका अर्थाने इथल्या शिक्षणव्यवस्थेची हार आहे. मुळात शिक्षणाचा गाभाघटक हा विज्ञानवादी असायला हवा, हा आग्रह वारंवार डॉ नरेंद्र दाभोलकर धरला होता. त्यामुळे त्यांच्या विचाराने प्रगत, समृद्ध आणि विज्ञाननिष्ठ महाराष्ट्राची वाटचाल होणे गरजेचे आहे. असे करणे हेच खऱ्या अर्थाने डॉ दाभोलकरांना अभिवादन ठरेल, असेही साहित्यिक अरुण जावळे यांनी शेवटी पत्रकात म्हटले आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy