सातारा : सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला धडक दिली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्कूटीचा देखील चक्काचूर झाल्याचे दिसून येत आहे.
माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील कारचा शनिवारी सकाळी अपघात झाला. ही घटना दहिवडी जवळील बिदाल शेरेवाडी भागात घडली आहे. गोरे यांच्या ताफ्यातील कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात कार आणि दुचाकीचा चक्काचूर झाला आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर, गंभीर जखमी झालेल्या दुसर्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अपघाताबाबत पुढील चौकशी करत आहेत.
