Explore

Search

April 19, 2025 8:05 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

…तर राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही : मनोज जरांगे पाटील

अंतरवली सराटी : मनोज जरांगे पाटील हे उद्या मालवणला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळला. त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाने राजकारण करू नका. हा राजकारणाचा विषय नाही. शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला तर राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीतून मालवणच्या राजकोट किल्लाकडे निघाले आहेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. छत्रपती शिवराय हे देशाचे दैवत आहेत. जी घटना घडली त्याने सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. ही घटना खूप दुर्दैवी आहे. छत्रपती शिवरायांना तुम्ही सहज घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही बोलूही शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तुमचं राजकारण तिकडंच जळू द्या : शिवाजी महाराजांवर राजकारण करू नये हे माझं म्हणणं आहे. विरोधी पक्ष असो की सत्ताधारी… तुम्ही महाराजांवर राजकारण करू नका. तुम्ही जर राजकारण करत असाल तर तुम्ही लोकांच्या मनातून उठणार. तुम्ही जर छत्रपती शिवरायांच्या विषयावर राजकारण करत असताल तर लोक तुमच्या विरोधात जातील. तुम्ही महापुरुषांच्या नादी लागू नका. तुमचे राजकारण तिकडेच जळू द्या, असा संताप मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

उद्या मालवणला जाणार : तुमच्या राजकारणासाठी तुम्ही चिखल फेक करणार असाल आणि शिवरायांचा वापर करणार तर आम्ही हे होऊ देणार नाही. मी आज मालवणला भेट द्यायला जात आहे. उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि दर्शन घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मी माफीत जाणार नाही : कोणी माफी मागितली, नाही मागितली… यात मी जाणार नाही. मी पहिल्या दिवशी राजकारण केलं नाही आणि कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत मला राजकारण करायचे नाही आणि त्यांनीही राजकारण करू नये. आरोपीला त्याच दिवशी अटक करायला हवी होती. तुम्ही आरोपीशी राजकीय हितसंबंध ठेवू नये, असं सांगतानाच आता एक सुधारित कायदा होणे गरजेचे आहे. यापुढे कोणत्याही महापुरुषाबाबत असा प्रकार झाला तर त्याला जामीनच देऊ नये. तो कायमचा तुरुंगामध्ये सडला पाहिजे. हे करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सुतार यांच्याकडून किल्ल्याची पाहणी : दरम्यान, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी आज राजकोट किल्ल्याची पाहणी केली आहे. राम सुतार यांचा राजकोट पाहणीचा दौरा प्रशासनाने अत्यंत गुप्त ठेवला आहे. राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले आहेत. सुतार राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहेत. तसेच या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत मोजकेच अधिकारी होते, असं सांगितलं जातं.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy