भर गर्दीत बस घुसली, 8 जखमी
मुंबई : गणपती आगमन मिरवणुका आणि खरेदीसाठी नागरिकांनी रविवारी केलेल्या गर्दीमध्ये बेस्टची बस शिरल्याची घटना मुंबईत घडली. लालबाग राजा येथील गरम खाडा मैदानासमोर हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. बसमधील दारूड्या प्रवाशाने चालकासोबत हुज्जत घालत स्टेअरिंग जबरदस्तीने फिरवल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात रस्त्यावरील अनेक वाहनांचेही नुकसान झाले.
बेस्ट बसची मार्गिका क्रमांक ६६ ही बस लालबागहून जात असताना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. बेस्ट बसमधील दारुड्या प्रवाशाने क्षुल्लक कारणावरून चालकासोबत वाद घातला. हा वाद इतका विकोपाला गेला, की प्रवाशाने डाव्या बाजूने स्टेअरिंग हातामध्ये घेत कसेही फिरवले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांना धडकली.
अचानक बस वेडीवाकडी चालू लागल्याने या ठिकाणी असलेल्या नागरिकांमध्ये पळापळ झाली. यामध्ये आठ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
