Explore

Search

April 12, 2025 10:46 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

St Bus Employees Strike : राज्यभरात एसटी कर्मचारी संघटना बेमुदत संपावर

मुंबई  : राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळातील कामगारांना वेतन द्यावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संघटनेकडून सेवा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासोबतच आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशाराही एसटी कर्मचारी संघटनेने दिला आहे. एसटी कामगाराने संयुक्त कृती समितीच्या वतीने प्रलंबित मागणी मान्य न झाल्याने हे आंदोलन केले जात आहे.

महाराष्ट्रात कुठे काय परिस्थिती?

एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारांपैकी 35 आगार पुर्णतः बंद करण्यात आले आहेत. सध्या मुंबई विभागातील एसटीच्या सर्व आगारातील वाहतूक सुरळीत सुरु आहे. मुंबई सेंट्रल डेपोतून सकाळी ७.३० वाजता सुटणारी रत्नागिरी बस ८.५० ला मुंबई सेंट्रल डेपोतून निघाली. प्रवाशांच्या संतप्त भूमिकेनंतर ही एसटी बस डेपोतून रवाना झाली आहे. अनेक प्रवाशी हे ७ वाजल्यापासूनच गाडीत बसून होते. तर ठाणे विभागातील कल्याण, विठ्ठलवाडी आगार पुर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यासोबतच राज्यातील इतर एसटी आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.

कोणकोणते आगार पूर्ण बंद?

तसेच मराठवाड्यातील लातूर आणि नांदेड विभागात बहुतेक एसटी आगार हे बंद आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील वाहतूक व्यवस्थित सुरू आहे. त्यासोबतच पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर, वल्लभनगर, भोर, सासवड, बारामती, तळेगाव हे आगार पूर्णतः बंद आहेत. तर सांगली जिल्ह्यात मिरज, जत, पलूस हे आगार पूर्णतः बंद करण्यात आले आहेत. तसेच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज, महाबळेश्वर हे आगार पूर्णतः बंद आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव ,पेठ हे आगार तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव हे आगार पूर्णतः बंद असल्याचे पाहायला मिळत आहे.

कल्याणमध्ये प्रवाशांची गर्दी

ऐन गणेशोत्सवादरम्यान एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यभरात एसटीची सेवा ठप्प झाली आहे. कल्याण विठ्ठलवाडी आगारातील एसटी कर्मचारी अचानक संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विठ्ठलवाडी बस आगारात गावाकडे जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी दिसत आहे. या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये गाड्या ठप्प

तसेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बस, डेपो मध्येच थांबून आहेत. एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तर अनेक प्रवासी बस स्थानकावर थांबून असल्याचे दिसत आहे. एसटीच्या संपामुळे लांब पल्याच्या अनेक गाड्या ठप्प झाला आहे.

दापोलीमध्ये सकाळपासून एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद 

तर रत्नागिरीतील दापोलीमधील एसटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. मुंबईतून आलेले अनेक प्रवासी सकाळपासून बससाठी ताटकळत बसले आहेत. तर ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी देखील महाविद्यालयात जाण्यासाठी बस नसल्याने डेपोमध्ये बसल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून प्रचंड घोषणाबाजी केली जात आहे. तसेच या मागण्या पूर्ण होईपर्यंत एसटी सेवा बंद ठेवणार असल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

विद्यार्थ्यांना मोठा फटका

गुहागरमधील डेपोमध्ये सकाळपासून बस फेऱ्या बंद आहेत. विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनाला बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. मुख्यमंत्र्यांकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. गणेशोत्सव काळात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या धरणे आंदोलनामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. या बंद असलेल्या बस सेवेचा फटका प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

धुळ्यामध्ये 3000 कर्मचारी संपावर 

धुळे विभागात एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बंद पुकारल्यामुळे त्याचा फटका धुळे बस स्थानकातील प्रवाशांना बसला आहे. अचानक बंद झाल्याने अनेक प्रवासी हे धुळे बस स्थानकात अडकले. धुळ्यामध्ये नऊ आगारातील 3000 कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी विविध बस स्थानकावर अडकले आहेत. बसेस लवकर सुरू कराव्यात अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy