कराडच्या संशयिताने घातला गंडा
सातारा : पश्चिम महाराष्ट्रासह विविध जिल्ह्यातील 400 लोकांची सुमारे 25 कोटींची आर्थिक फसवणूक प्रकरणी कराड येथील प्रमोद रमेश पाटील याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी अल्लाउद्दीन तांबोळी यांच्यासह गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केली.
याबाबत माहिती देताना तांबोळी म्हणाले, आमच्याकडून वेगवेगळ्या दिवशी, ऑनलाइन पद्धतीने व्यवसाय कामासाठी म्हणून आणि मदत म्हणून कराड येथील प्रमोद रमेश पाटील यांनी पैसे घेतले होते. त्या बदल्यात त्यांनी नोटरी आणि त्यांच्या नावाचे चेक सुद्धा दिले होते. परंतु नोटरीची मुदत संपल्यानंतर त्यांना पैसे मागितले असता त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. मी महाराष्ट्रातील मोठ्या राजकारण्यांना ओळखतो. तुम्ही माझे काहीच वाकडे करू शकत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. तुमचे पैसे देणार नसल्याच्या धमक्या वेळोवेळी पाटील देत होता.
याबाबत आम्ही यापूर्वी कराड शहर पोलीस ठाणे, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, यांच्याशी पत्रव्यवहार केले आहेत. मात्र कराड पोलिसांकडून आम्हाला म्हणावे तसे सहकार्य झाले नाही्. ते कायम पाटील याचीच बाजू घेत होते. त्यामुळे यामध्ये काही आर्थिक देवाण-घेवाण तर झाली नाही ना अशी शंका यावेळी त्यांनी उपस्थित केली.
यावेळी प्रमोद पाटील यांनी प्रत्येकाला फोन करून मी तुमचे पैसे वेळेत परत करतो असेच सांगत होता. तुम्ही पत्रकार परिषद घेतली तर मी तुम्हाला एक रुपया देणार नाही. अशी गुंडगिरीची भाषा केली. काही लोकांना वैयक्तिकरित्या धमक्याही दिल्या. त्यामुळे आम्ही सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. त्यांनी आमची बाजू ऐकून घेऊन योग्य मार्गदर्शन केले.
या पत्रकार परिषदेला आर्थिक फसवणूक झालेले बरेच लोक यावेळी उपस्थित होते.
