Explore

Search

April 13, 2025 12:15 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

New Delhi : दलित विद्यार्थ्यांसाठी उघडली ‘आयआयटी’ची दारे

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा ऐतिहासिक आदेश

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विशेषाधिकारांचा वापर करत केवळ आर्थिक परिस्थितीमुळे प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या उत्तरप्रदेशातील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील खतौली गावातील दलित विद्यार्थ्यासाठी आयआयटी धनबादची दारे खुली केली आहेत. ‘एवढी मोठी प्रतिभा केवळ पैशांच्या अभावी वाया जाता कामा नये,’ अशी टिपणी करत सरन्यायाधीशांनी संबंधित विद्यार्थ्याला भावी करिअरसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात प्रथमच असा प्रसंग घडला आहे.

जेईई- ॲडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आयआयटी प्रवेशासाठी अतुल कुमार याने समुपदेशनाला हजेरी लावली होती. यानंतर त्याचा आयआयटी धनबादमध्ये प्रवेशही निश्चित झाल्याचे सांगण्यात आले होते. या प्रवेशासाठी २४ जून रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत शुल्क जमा करण्याची मुदत होती. घरची परिस्थिती गरिबीची असल्यामुळे त्याने गावातील लोकांची मदत मागितली. मात्र, पैसे भरेपर्यंत शुल्क जमा करण्यासाठीचे सर्व्हर बंद झाले होते. शुल्क भरायच्या केवळ चार सेकंद आधी संबंधित सर्व्हर बंद झाले होते.

प्रवेश न मिळाल्यामुळे अतुल कुमार याने झारखंड उच्च न्यायालयात  दाद मागितली होती. त्याला तेथे दिलासा न मिळाल्यामुळे त्याने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. ‘‘आपल्या अशिलाचे वडील मेरठच्या कापड कारखान्यात मजूर असून ते दिवसाला ४५० रुपये मिळवितात. त्यांच्यासाठी १७ हजार ५०० रुपयांची तरतूद करणे कठीण आहे. गावातील लोकांनी एकत्र येत शुल्कासाठीचे पैसे जमा केले होते,’’ असा युक्तिवाद अतुल कुमार याच्यामार्फत त्यांच्या वकिलांनी केला.

फरफटीची न्यायालयाकडून दखल

उभय बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी प्रतिभाशाली युवकाची प्रतिभा वाया जाण्याची अनुमती दिली जाऊ शकत नाही असे सांगितले. ‘‘ पीडित युवक झारखंड कायदा सेवा प्राधिकरणात गेला, तेथून त्याला उच्च न्यायालयात पाठविण्यात आले, आता हा युवक सर्वोच्च न्यायालयात आला आहे. एका दलित मुलाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे पाठविले जात आहे,’’ असा शेरा मारत चंद्रचूड यांनी अतुल कुमार याला प्रवेश दिला जावा, असे आदेश दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा मला आनंदच झाला असून केवळ आर्थिक कारण पुढे करत माझी संधी हिरावून घेतली जाऊ शकत नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. आधी घसरलेली माझी गाडी पुन्हा रुळावर आली आहे. न्यायालय मला मदत करेल याची मला पूर्ण खात्री होती. इलेक्ट्रिकल इंजिनिअर होण्यासाठी मी कठोर मेहनत करेल.अतुल कुमार, विद्यार्थी

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy