Explore

Search

April 14, 2025 1:25 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : कोडोली येथे बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय शिवसेनेने फोडले

चुकीच्या वसुली प्रक्रियेमुळे केले टाळे ठोक आंदोलन

सातारा : सातारा शहरातील फायनान्स कंपन्यांनी चुकीची वसुली प्रक्रिया राबवली आहे. त्यामुळे माणसांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करत कोडोली येथील बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालयाला टाळे ठोकले. तत्पूर्वी शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयाची तोडफोड केली. या तोडफोडीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.

सातारा शहरात फायनान्स कंपन्यांची वसुली खाजगी सावकारीच्या पुढे गेली आहे. त्यांची मुजोरी वाढली असून सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक, वृद्ध महिला, स्त्रिया यांना दमदाटीची भाषा वापरली जात आहे. त्यांच्या वसुली प्रक्रियेवर जिल्हा प्रशासनाचे कोणते नियंत्रण नाही, असा आरोप उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी करत काही दिवसापूर्वी प्रशासनाला निवेदन सादर केले होते. तसेच प्रशासनाला या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र शासन पातळीवर कोणतीच हालचाल न झाल्याने शिवसेनेने सोमवारी अचानक आंदोलनाचा पवित्र घेतला. कोडोली येथे शिवसैनिकांनी जाऊन बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला टाळे ठोकले.

कार्यालयाच्या सर्व कर्मचार्‍यांना शिवसैनिकांनी कार्यालयाबाहेर काढले. तसेच तेथे शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालयाची तोडफोड केली. यापुढे फायनान्स कंपन्यांचा मुजोर कारभार सातार्‍यात चालू देणार नाही, असा इशारा सचिन मोहिते यांनी दिला. तोडफोड सुरू झाल्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण तयार झाले. सातारा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांना ताब्यात घेतले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy