माजी खासदार पूनम महाजन यांचे प्रतिपादन
सातारा : “मोठी स्वप्ने बघा. त्याला परिश्रमाची जोड द्या. आजचा युवकच भारताला एक वैभवशाली राष्ट्र म्हणून घडवू शकतो” असे प्रतिपादन माजी खासदार मा. पूनम महाजन यांनी आज समर्थ एज्युकेशनल ट्रस्टच्या सावकार आयुर्वेदिक कॉलेज व होमिओपॅथी कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समोर केले.
महाराष्ट्राच्या विकासात युवकांचे योगदान या विषयावर आज माननीय पूनम ताई महाजन यांचे व्याख्यान सावकार आयुर्वेदिक महाविद्यालयावर आयोजित करण्यात आले होते. भाजपच्या गटनेत्या आचार्य सिध्दी पवार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ श्रीकांत काशीकर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या पुढे म्हणाल्या, “1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले व 2047 साली स्वतंत्र होऊन शंभर वर्ष होतील अशावेळी भारताकडे संपूर्ण जग हे एक महासत्ता या दृष्टिकोनातून बघेल. पण भारत जर महासत्ता व्हायचा असेल तर, आत्ता जे युवक शिक्षण घेत आहेत त्यांनी मोठी स्वप्न बघितली व त्याला परिश्रमाची जोड दिली, तरच हे स्वप्न पूर्ण होऊ शकेल. गेल्या काही वर्षांमध्ये स्टार्टअप, silicon hub सारख्या अनेक योजनांच्या माध्यमातून भारताला महासत्ता बनवण्याच्यासाठी खूप प्रयत्न केले जात आहेत.”
आयुर्वेदिक कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत काशीकर यांनी त्यांचे सुरुवातीला स्वागत केले. प्राध्यापिका तृप्ती नलगे मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व आयुर्वेद कॉलेजची विद्यार्थिनी कुमारी तेहरीम खान हिने कार्यक्रमाचे आभार मानले. सावकार होमिओपॅथी कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ.शीतल इनामदार या वेळेला उपस्थित होत्या. समर्थ आयुर्वेदिक कॉलेजचे व होमिओपॅथी कॉलेजचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली व त्यानंतर कॉलेजमधील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी माननीय पूनम महाजन यांच्याबरोबर मुक्त संवाद साधला.
