अपशिंगे शाळा, शिरवळच्या ज्ञानसंवर्धिनी शाळेचे यश
सातारा : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन मध्ये सातारा जिल्ह्यातील दोन शाळेचा गौरव झाला आहे. शासकीय शाळांच्या गटामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अपशिंगे मिलिटरी (ता. सातारा) या शाळेचा कोल्हापूर विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ज्ञानसंवर्धिनी विद्यालय शिरवळ (ता. खंडाळा) या शाळेला कोल्हापूर विभागांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान ऑगस्ट २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीदरम्यान शाळांमध्ये राबविण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात सुमारे ९८ हजार शाळांमधून सुमारे १ कोटी ९१ लाख विद्यार्थी, तर सुमारे ६ लाख ६० हजार शिक्षक या अभियानाच्या विविध उपक्रमात सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्प्यासाठी पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या प्रमूख घटकांवर आधारीत एकूण १५० गुणांचे विविध स्पर्धात्मक उपक्रम निश्चित करण्यात आले होते.
अपशिंगे शाळा व ज्ञानसंर्वधिनी शाळेतील शिक्षकांचा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मुंबई येथील कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी साताऱ्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे उपस्थित होते. स्पर्धेतील यशस्वी शाळांचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी अभिनंदन केले.
