वडीगोद्री : आता मराठ्याचा विश्वास वाढला, आता मराठा समाज प्रत्येक मतदारसंघात एक जुटीने चालणार आहे. आपल बळ वाढलं आहे, त्यामुळे मराठा समाज आता एकत्र येणार आहे. रस्ता सोडून एकही मराठा बांधव चालणार नाही, कारण विजयाची वाट आता दिसायला लागली आहे. येत्या ३ तारखेला उमेदवार निश्चित करणार आहोत, असे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ते अंतरवालीत पत्रकारांशी संवाद साधत होते.
राज्यात एका जातीवर या निवडणुका जिंकणे सोपे नाही. त्यामुळे समीकरणे आवश्यक आहेत. आता मराठा, दलित, मुस्लिम तसेच छोटया- छोटया जाती आपल्या लेकरांसाठी एकत्र येणार आहेत. धाकाने, दहशतीने एखाद्या नेत्यामागे काही लोक फिरतील, पण आता मात्र मतदान तिकडे जाणार नाही. येत्या तीन तारखेला उमेदवार फायनल करणार, म्हणजे चार तारखेला कोणी माघार घ्यावी, हे ठरविणार आहोत. माझी सगळ्यांना विनती आहे की, इकडे चार तारखेच्या नंतर या, गर्दी करू नका. शनिवारपर्यंत सगळ्या उमेदवाराच्या बैठका घ्या आणि त्यातून एक ठरवा. ते तुमच्या फायद्याचे राहील. एकमेकांशी वाद करू नका, एक उमेदवार ठरवा. मनाचा मोठेपणा दाखवा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
समरजीत घाडगे यांची भेट
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात नुकतेच सामील झालेले कागलचे (जि. कोल्हापूर) समरजीत घाटगे यांनी शुक्रवारी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली.
सरकार आमचंच येणार
आमचंच सरकार येणार आहे. आता लिहून घ्या, तुम्ही नाही अन् तेही नाही. तुम्हाला आरक्षण मागितलं तर तुम्ही पंधराशे रुपये देता. ही हीन वागणूक आहे. म्हणजे तुम्ही आमच्या भावनेची किंमत करता का? असा सवाल जरांगे यांनी केला.
