ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांची सातार्यात टीका
सातारा : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि त्याला पुरोगामी विचारांची परंपरा आहे. महाराष्ट्र प्रयोगशील असून येथे विविध चळवळी यशस्वी झाल्या. अशा महाराष्ट्राच्या उज्वल परंपरेला महायुतीचे सरकार आणि त्यांचा कारभार बट्टा लावत आहे. महायुती शासनाने गेल्या दोन-तीन महिन्यात एक लाख कोटी रुपये मतांच्या भिकेसाठी वाटले, अशी जळजळीत टीका आम आदमी पार्टीचे सहसंस्थापक व भारत जोडो अभियानाचे समन्वयक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सातार्यात केली.
यावेळी इंडिया जोडो अभियानाचे समन्वयक ललित बाबर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, लेक लाडकी अभियानाच्या सर्वेसर्वा एडवोकेट वर्षाताई देशपांडे, महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम इत्यादी यावेळी उपस्थित होते.
यादव पुढे म्हणाले, गृह मंत्रालयाच्या परिकोषांमध्ये शहरी नक्षलवादी हा शब्दच नाही. तरीसुद्धा अनेक गांधीवादी चळवळीतील विचारवंतांना गृहमंत्री फडणवीस सरळ सरळ शहरी नक्षलवादी म्हणत आहेत. त्याचा शोध त्यांना आत्ताच निवडणुकीदरम्यान का लागला? यापूर्वी त्यांचे दहा वर्षे सरकार होते. मग त्यांना तेव्हा ते समजले नाही का, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र शासनाने गेल्या तीन महिन्यांमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी एक लाख कोटी रुपये वाटले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राची स्थिती खालावलेली आहे. ही मदत म्हणजे मतांची मागितलेली भीक आहे. भारतीय जनता पार्टी संविधानात बदल करून भारतातील लोकशाही खड्ड्यात घालत असून देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे, असा धोका यादव यांनी बोलून दाखवला.
उल्का महाजन म्हणाल्या, भारतीय जनता पार्टी ही खोटारडी पार्टी आहे. प्रत्येक वेळेला ते सर्वसामान्य जनतेला वेठीला धरतात. संविधान चळवळ ही महत्त्वाची आहे. संविधान वाचवण्यासाठी भारत जोडो अभियान सुरू करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीने जातीपाती मध्ये भांडणे लावण्याचे उद्योग केले आहेत. मात्र आमची चळवळ निवडणुकीनंतरही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमितदादा कदम म्हणाले, सातारा-जावली विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी मतदान म्हणजे ही केवळ प्रक्रिया न मानता परिवर्तन करणारी लोकशाही चळवळ आहे, असे म्हणून मतदान करावे. मी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे आणि जनतेला चांगल्या वाईटाची जाण आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
