शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे सातार्यात कडाडल्या
सातारा : 40 गद्दारांनी शिवसेना सोडली, त्या गद्दारांनी सत्तेवर येऊन केलेल्या घोषणा कशा खोटारड्या आहेत हे आम्ही सिद्ध करणार आहोत. त्यासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार अमित कदम यांना प्रचंड बहुमताने निवडून देत घराघरात मशाल चिन्ह पोहोचवणार आहोत. चाळीस गद्दारांच्या जाण्याने शिवसेनेला फरक पडला नाही, तर काल-परवा एखाद्या दुसर्या कार्यकर्त्याच्या जाण्याने काही फरक पडत नाही शिवसेना गद्दारांना कधी भीक घालत नाही असा घणाघात शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांनी केला.
छायाताई शिंदे यांच्या उपस्थितीत सातार्यात शिवसेना महिला आघाडीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला जावली महिला संघटिका अमृता पाटील, बेबीताई गोळे, कॉंग्रेस शहराध्यक्ष रझा शेख, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष तेजस्विनी केसरकर, सातारा जावली विधानसभा संपर्क संघटक विजयश्री साखरे, जावली तालुका उपजिल्हा संघटक रंजना गुजर, मेढा-जावली उपजिल्हा संघटक वासंती पाडळे इत्यादी महिला यावेळी उपस्थित होत्या.
या बैठकीला छायाताई शिंदे आणि अमितदादा कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे हणमंतराव चवरे यांनीही उपस्थिती लावली होती.
छायाताई शिंदे म्हणाल्या, चाळीस गद्दारांनी बाहेर पडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. मात्र त्याचा शिवसेनेला कधीही फरक पडला नाही. पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देऊन हे सरकार त्यांना फसवत आहे. हे आमच्याच कष्टाचे पैसे आहेत. याउलट उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना महिलांसाठी केलेल्या योजना, शेतकर्यांसाठी कर्जमाफी, शिवभोजन थाळी यासारख्या योजनांची आजही आठवण काढली जाते. अफवा पसरवून मतांची लाचारी स्वीकारण्याचे काम सुरू आहे. शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आम्हाला आदेश आहे. मशालचे चिन्ह आम्ही घराघरात पोहोचवणार आहोत. महाविकास आघाडीचे सातारा-जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमितदादा कदम यांना आम्ही बहुमताने निवडून आणणार आहोत. त्यासाठी सातारा व जावली तालुक्यातील महिला संघटन कामाला लागले आहे.
ज्या गद्दारांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्या जाण्याने शिवसेना अधिक प्रबळ झाली असून त्यांच्या जाण्याने काही फरक पडला नाही तर काल-परवा एखादा दुसरा कार्यकर्ता गेला जो आमच्या हिशोबातही नव्हता त्याला आम्ही गृहीत धरत नाही. त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही, असा टोला छायाताई शिंदे यांनी माजी जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना लगावला.
अमितदादा कदम यावेळी बोलताना म्हणाले, माझी उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेसाठी आणि जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. सामान्य मतदारांनी केवळ मतदान करणे एवढीच ही प्रक्रिया गृहीत धरू नये. मतदान म्हणजे ही परिवर्तनाची चळवळ आहे. या चळवळीकडे त्यांनी वेगळ्या दृष्टीकोनातून बघणे गरजेचे आहे. परिवर्तन घडवण्यासाठी मतदार राजाच्या पाठबळाची गरज आहे. सातारा-जावलीच्या विकासासाठी ही परिवर्तनाची मशाल पेटवण्याची जबाबदारी मतदार राजावर आहे. तुमचे प्रश्न घेऊन त्याला वेगळा आयाम देण्यासाठी अमित कदम यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे. आपले सहकार्य गरजेचे आहे, असे कळकळीचे आवाहन अमितदादा कदम यांनी केले.
