सातारा : विधिमंडळामध्ये सर्वांत जास्त प्रशश्न विचारणारा आमदार म्हणून आ. दीपक चव्हाण यांची ख्याती आहे. विजयाची हॅट्ट्रिीक त्यांनी केली आहे, आता चौकार मारण्याची संधी त्यांना द्या. राज्यातील महायुतीचे सरकार गुजरातची चाकरी करत आहे, ती पुन्हा करायला लागू नये, यासाठी महायुतीचे सरकार हद्दपार करा, असे आवाहन खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
पिंपाडे बुद्रुक येथे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ. दीपक चव्हाण यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, पुरुषोत्तम माने, सह्याद्री कदम, संजय साळुंखे, अशोकराव लेंभे, विकास साळुंखे, नागेश जाधव, अमोल आवळे उपस्थित होते. खा. कोल्हे म्हणाले, भाजप या राज्याला झुकवण्याचे काम करत आहेत. चोरलेली गोष्ट अभिमानाने मिरवता येत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना तर खा. शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष निर्माण केला. त्यांचीच चिन्हे विरोधकांनी चोरली. महाराष्ट्र झुकवण्यासाठी दिल्लीवाले प्रयत्न करत होते, पण 84 वर्षांचा योध्दा भाजप नेत्यांपुढे झुकला नाही. महायुती सरकारने शेतकर्यांच्या ताटात माती कालवली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले, फलटण मतदारसंघ 15 वर्षांपूर्वी नव्याने तयार झाला. 10 आमदारांचे आठच आमदार झाले. कोरेगाव तालुका तीन मतदारसंघांत विभाजीत झाला. राखीव झालेल्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची, हा प्रश्न होता. मात्र, आ. दीपक चव्हाण यांना दिलेली उमेदवारी त्यांनी सार्थकी लावली. कार्यक्षम आमदार म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणारा आमदार अशी त्यांची ख्याती आहे. त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा.
भाजपमुळे जाती-जातीत भांडणे : आ. चव्हाण
आ. दीपक चव्हाण म्हणाले, राज्यात चिंताजनक परिस्थिती आहे. माणसामध्ये माणूस ठेवला नाही. जातीजातींमध्ये भांडण लावले. भाजप याला जबाबदार आहे. घराघरामध्ये फूट पाडली. ईडी, सीबीआयचा धाक बसवला. फलटणमध्ये तर धमकी, दमदाटी याचेच राजकारण सुरू आहे. माजी खासदारांनी फलटण मतदारसंघात हायमास्ट बसवण्याशिवाय ठोस असे काही केले नाही.
