धाराशिव : पहिल्या टप्प्यात सात जणांचे मंत्रीमंडळ असताना मी दोन लाख रुपयांची शेतकर्यांना कर्जमाफी दिली. त्यात राजकारण नव्हते. त्याच पध्दतीने आपले सरकार आल्यानंतर सोयाबीन, दुधाला हमीभाव देणार. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार असे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा शिव- सेनेचे पक्षप्रमुख (युबीटी) उध्दव ठाकरे यांनी दिली.
शिवसेना पक्षाचे उमेदवार आ. कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. कन्या शाळेच्या मैदानावर ही जंगी सभा झाली. या वेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. पाटील, तुळजा पूरचे काँग्रेसचे उमेदवार अॅड. चौरज पाटील, परंड्याचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल मोटे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले, की शिवसे नेसारखा दिलदार मित्र भाजपने गमावला. आम्ही केवळ वडिलांना दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी दिलेला शब्द मागितला होता, तो पूर्ण तुम्ही करण्यास मदत केली नाही. त्यामुळेच राज्यात महाविकास आघाडी आकाराला आली. आमचे हिंदुत्व हे चूल पेटवणारे आहे. तर भाजपाचे हिंदुत्व हे घरं पेटवणारे आहे. जम्मू काश्मिरमध्ये ३७० वे कलम हटवले तेव्हा शिवसेना भाजपसोबत होती. हे भाजप विसरत आहे. आता हे कलम हटवल्यानंतर तिथे अदाणीसारखे लोक जमिनी विकत घेत आहेत. त्यामुळे याचे खरे लाभार्थी अदाणीस रखे लोक आहेत.
भाजपचा हा बुरखा सर्वांनी लोकसभेला फाडला. आता तसाच तो विधानसभेलाही फाडा. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी करा असे आवाहन केले. यावेळी आ. पाटील यांनी सत्ता आल्यानंतर मांजरा, तेरणा नदीवरील सर्व कोल्हापुरी बंधारे बरेजसमध्ये रुपांतरीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी केली. खा. राजेनिंबाळकर यांनी या वेळी भाषण केले.
आ. पाटील यांचे कौतुक
आ. कैलास पाटील यांचे कौतुक करताना ठाकरे म्हणाले, की सोन्याच्या लंकेजवळ आ. पाटील यांना नेले जात होते. त्या वेळी आ. पाटील सातत्याने संपर्कात होते. त्यानंतर काही वेळातच ते शिताफीने निसटले, लंका सोन्याची असली तरी ती रावणाची आहे हे त्यांना माहिती होते. आ. पाटील यांनी निष्ठा जपून धाराशिवच्या नावाला कलंक लागू दिला नाही.
