सातारा : महाराष्ट्र शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र व कर्मवीर दादासाहेब गायकवाड समाजभूषण पुरस्कार प्रदान करून गौरवलेल्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक-सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या कै. सौ. कलावती माने बालविकास केंद्र, समाजभूषण दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिर, श्री. छ. प्रतापसिंहमहाराज राजेभोसले हायस्कूल, माने कॉलनी सातारा या शैक्षणिक संकुलाच्या वतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती करण्यात आली.
लोकशाहीचे बळकटीकरण करण्यासाठी, सर्वांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा यासाठी मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत तसेच संस्थेचे सचिव संजीव माने यांच्या संकल्पनेतून शाळेचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या माने कॉलनी, देगावरोड, सातारा पासून देगाव फाटा चौकापर्यंत मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ‘मतदानाचा हक्क बजवा मातृभूमीची शान वाढवा’, ‘जागरूक मतदार आपले मतदान लोकशाहीचा प्राण लोकशाहीचा आधार’, ’चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया, ‘छोडकर सारे काम चलो करे मतदान’ अशा घोषणा दिल्या. या मानवी साखळीमध्ये ढोल-ताशांच्या गजरात तसेच घोषपट्ट्या घेऊन विद्यार्थ्यांसह पालकही उत्साहाने सहभागी झाले.
शाळेने आयोजित केलेली मानवी साखळी परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेत होती. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ- पालक तसेच शिक्षक कर्मचारी यांनी मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ घेतली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन कमिटी, माता-पालक संघ, परिवहन समितीचे सर्व पदाधिकारी, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेने आयोजित केलेल्या या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन पालकांनी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
