डॉक्टरांनी सांगितल्या सोप्या टिप्स
थंडीचा कडाका वाढला की त्वचा खूप जास्त कोरडी होते आणि उलते. त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागतो. ज्यांना वायजळचा त्रास असतो त्यांना तर हिवाळ्यात अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. शेतात काम करणाऱ्या महिलांना हा त्रास जास्त असतो. त्यांचे जास्तीत तळपाय बेकार होतात. तर हिवाळ्यात तळपायाची काळजी कशी घ्यावी याबाबत आपण माहिती जाणून घेऊ.
हिवाळ्यात तळपायाची काळजी कशी घ्यावी?
याबाबत त्वचा रोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी पडते. त्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. त्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. तळपायाला जर वायजळ असेल तर त्याची सुद्धा योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी एक सोपा उपाय म्हणजे पाय 15 मिनिट कोमट पाण्यात बुडून ठेवावे त्यामुळे पाय नरम राहतील. पाण्यात काहीच टाकायची गरज नाही साध्या पाण्यात पाय बुडून ठेवावे. त्यानंतर साध्या ब्रशने पाय घासून घ्यायचे.
त्यानंतर पायासाठी जे युरिया युक्त मॉइश्चरायझर येतात ते लावावे. रात्री झोपताना हे मॉइश्चरायझर जर तुम्ही वापरले तर तुमचे पाय अगदी नरम राहतील. त्याचबरोबर पायावर जास्त मळ साचू द्यायचं नाही. त्यामुळे अनेक किटाणू तयार होतात आणि पायाला खाज सुटते. खाजवल्यास फोड तयार होतात. त्यामुळे पायाची योग्य निगा राखणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या पायाला वायजळ असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. घरगुती उपाय जास्त करत बसायचे नाही. खूप जास्त वायजळ असल्यास डॉक्टरांचा सल्ला खूप महत्वाचा आहे.
