अंडर 19 आशिया कप 2024 स्पर्धेतील 12 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध संयुक्त अरब अमिराती आमनेसामने होते. टीम इंडियाने आपल्या साखळी फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात यूएईवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला आहे. भारतीय गोलंदाजांनी यूएईला 44 ओव्हरमध्ये 137 धावांवर गुंडाळलं होतं. त्यामुळे भारताला विजयासाठी 138 धावांचं आव्हान मिळालं होतं. वैभव सूर्यंवशी आणि आयुष म्हात्रे या भारताच्या सलामी जोडीनेच हे विजयी आव्हान सहज पार केलं आणि भारताला सलग आणि एकूण दुसरा विजय मिळवून दिला. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. पाकिस्ताननंतर ए ग्रुपमधून टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
टीम इंडिया 10 विकेट्सने विजयी
टीम इंडियाने हे विजयी आव्हान एकही विकेट न गमावता 203 बॉलआधी पूर्ण केलं. टीम इंडियाने 16.1 ओव्हरमध्ये 143 धावा केल्या. वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या दोघांनी नाबाद अर्धशतकी खेळी केली. वैभवने सर्वाधिक 76 तर आयुषने 67 धावा केल्या. वैभवने 51 बॉलमध्ये 4 सिक्स आणि 4 फोरसह 76 रन्स केल्या. वैभवचं हे या स्पर्धेतील पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं. तर दुसऱ्या बाजूला आयुष म्हात्रेने सलग दुसरं अर्धशत ठोकलं. आयुषने जपाननंतर यूएईविरुद्ध ही खेळी केली. आयुषने 4 चौकार आणि 4 षटकारांसह 67 धावांची खेळी केली.
पहिल्या डावात काय झालं?
त्याआधी यूएईने बॅटिंगचा निर्णय घेतला.मात्र भारतीय गोलंदाजांसमोर यूएईच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले. यूएईकडून फक्त चौघांनाच दुहेरी आकडा गाठता आला. तर इतर फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी पद्धतशीर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. टीम इंडियाकडून युद्धजित गुहा याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. चेतन शर्मा आणि हार्दिक राज या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : मोहम्मद अमान (कर्णधार), आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, आंद्रे सिद्धार्थ सी, केपी कार्तिकेय, निखिल कुमार, हरवंश सिंग (विकेटकीपर), हार्दिक राज, समर्थ नागराज, चेतन शर्मा आणि युद्धजित गुहा.
संयुक्त अरब अमिराती प्लेइंग इलेव्हन : अयान अफझल खान (कर्णधार), अक्षत राय, आर्यन सक्सेना, यायिन राय, एथन डीसूझा, मुहम्मद रायन खान, नूरउल्ला अयोबी, मुदित अग्रवाल (विकेटकीपर), उद्दीश सुरी, हर्ष देसाई आणि अली असगर शम्स.
