विविध मान्यवरांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थीही सुखावले
सातारा : गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीच्या सातारा कॉलेज ऑफ फार्मसी मधील मुलांच्या वस्तीगृहात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा आगमन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विद्यार्थीही सुखावले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून नेत्रचिकित्सक डॉक्टर अरुणाताई बर्गे, अध्यक्ष म्हणून गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉक्टर अनिरुद्ध जगताप, गौरीशंकर एज्युकेशन सोसायटीचे स्वीय सहाय्यक म्हणून श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. एन. एच. अलुरकर, एच. जे. काळे, सौ. एम. व्ही. जाधव, कविवर्य सुरज महाडिक, व्ही. एस. शिंदे, प्रमुख वक्ते म्हणून ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीधर साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकपर भाषणात सुरज महाडिक म्हणाले, इतर संस्थांमधून मोठ्या पगाराची ऑफर असतानाही केवळ आणि केवळ या वसतिगृहातील मुलांनी लावलेल्या प्रेमामुळे मी इथे राहिलो. इथेच समजले की पैशाची किंमत होते, मात्र प्रेमाची किंमत होत नाही. जीवनामध्ये अध्यात्मिक गुरुचे स्थान असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्याद्वारेच आपल्याला जीवनाचे सार समजते.
यावेळी बोलताना अरुणाताई बर्गे म्हणाल्या, समाजसेवेचा वारसा आम्हाला पूर्वापार लाभला आहे. 2020 साली जेव्हा कोरोना संसर्गजन्य रोगाने जगात थैमान घातले होते, तेव्हा तो रोग कोरेगाव तालुक्यातही पसरला होता. मात्र खटाव पासून कोरेगाव पर्यंत अगदी कमी हॉस्पिटल्स असल्यामुळे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून आम्ही कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटल उघडले. तिथे हजारो लोकांचे मोफत उपचार करण्यात आले. हे उपचार सुरू असताना विरोधकांची ही भीती होतीच कुठे काही कमी पडले तर विरोधकांना तेवढेच आयते पोलीस सापडले असते मात्र आम्ही सगळ्यांनी सर्व प्रसंगांवर मात करत 28 हजार 800 रुग्णांवर मोफत व योग्य उपचार केले त्याचा आम्हाला अभिमान आहे. या वसतीगृहावर सुरज महाडिक यांचे मायेच्या ममतेने लक्ष आहे. त्यांची प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे, असेही त्या म्हणाल्या.
डॉ. श्रीधर साळुंखे म्हणाले, आयुष्यात अध्यात्मिक व्यासंग हा व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे. सुरजने जी आत्मिक तळमळ मांडली, ती खूप दिवस आत साठून राहिलेली होती. ती फक्त या प्रसंगातून बाहेर आली. आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना मुलांनो आपण सदोदित लक्षात ठेवली पाहिजे आणि भविष्यातही त्याचा अंगीकार केला पाहिजे. या संस्थेने तुम्हाला काय दिले तसेच तुम्हाला कसे घडवले हेही तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
यावेळी महाविद्यालयाच्या वसतीगृहातील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते पार पडला. आभार सहाय्यक प्राध्यापिका सौ. एम. व्ही. जाधव यांनी मानले.
