JPC स्थापनेची मागणी
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.५) ९ वा दिवस आहे. दरम्यान, काँग्रेस खासदारांची संसद भवन संकुलात अदानी मुद्द्यावर निदर्शने केली. यावेळी संसद सभागृहात अदानी मुद्यावर चर्चा व्हावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मुद्द्यावर बोलावे तसेच अदानी प्रकरणावर संसदीय समिती स्थापन करावी, अशा मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली आहे.
अदानी समुहाचे अध्यक्ष उद्योगपती गौतम अदानी आणि कंपनीच्या इतर अधिकाऱ्यांवर अमेरिकेने लाचखोरी आणि फसवणुकीचा आरोप केला आहे. या आरोपाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणीदेखील विरोधी पक्षांनी यावेळी केली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी यांच्यासह विरोधी खासदारांनी देखील निदर्शनात सहभाग घेतला.
संसद परिसरातील निदर्शनावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी अदानी मुद्द्यावरून त्यांच्या निषेधाचे प्रतीक असलेली जॅकेट परिधान केली होती. यावेळी संसदेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी “मोदी जी अदानीजींची चौकशी करू शकत नाहीत कारण त्यांनी तसे केले तर ते स्वतःचीच चौकशी करतील…मोदी और अदानी एक हैं. दो नही हैं, एक हैं,” असे अदानी प्रकरणाच्या निषेधार्थ निदर्शन आंदोलनात सहभागी होताना म्हटले आहे.
