देवापूर : माण तालुक्यातील म्हसवड परिसरात ऊसतोड सुरू आहे. देवापूर, पळसावडे, म्हसवड, हिंगणी, ढोकमोड, शिरताव, वर-मलवडी, गंगोती, पानवण, वडजल, दिवड, पळशी व म्हसवड परिसरातील ऊस वाहतूक म्हसवड-दहिवडी या मुख्य रस्त्यावरुन होत आहे. या रस्त्यावर रहदारी वाढल्याने ओव्हरलोड वाहनामधून होणारी ऊस वाहतूक धोकादायक ठरत आहे. उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलींना रिफ्लेकटर नसल्यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत असल्याने म्हसवड-दहिवडी रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु असल्याने ऊस वाहतूक जोमात सुरु आहे. माण तालुक्यातून देवापूर, पळसावडे, म्हसवड, हिंगणी, ढोकमोड, शिरताव, वर मलवडी, गंगोती, पानवण, वडजल, दिवड, पळशी व म्हसवड परिसरातील ऊस म्हसवड-दहिवडी या रस्त्याने पडळ, गोपुज, जरंडेश्वर, फलटण या कारखान्यांना जातो. ट्रॅक्टर चालक क्षमतेपेक्षा जास्त दोन दोन ट्रॉली लावून ऊस वाहतूक करत असतात. विशेष म्हणजे बहुतांशी ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर नसून आर.टी. ओ.चे सर्व नियम पायदळी तुडवले जात आहेत. ऊस वाहतूक करणार्या वाहनांमुळे अपघातात वाढ झाली असून अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळेच मुख्य रहदारीचा म्हसवड -दहिवडी रस्ता वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळाच बनला आहे.
क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने ही वाहने रस्त्यावरील चढ-उतार, वळणांवर हेलकावे मारतात. तर बर्याचदा ड्रायव्हरला पाठीमागील वाहनांचा अंदाजही येत नाही. त्यात भरीस भर म्हणून मोठ्या आवाजातील संगीत ऐकत ट्रॅक्टर चालकांचा आपल्याच नादात प्रवास सुरु असतो. काही मद्यधुंद बहाद्दरांना अपघात व पाठी मागून येणार्या वाहनांचे काहीही देणे घेणे नसते. कारखाना स्थळावर वेळेवर ऊस पोहचावा म्हणून वाहनांचा वेग वाढवला जातो. त्यामुळे वाहन पलटी होण्याचा धोका असून इतर सहप्रवासी वाहनांना अपघाताचा धोका वाढला आहे. ऊस वाहतूक करणार्या वाहनांना रिफ्लेक्टर नसलेली वाहने रस्त्यावर थांबवल्यामुळे रात्रीच्या अंधारात दुचाकी, चारचाकी वाहने या ट्रॉलीला धडकून अपघात होत आहेत. रिफ्लेक्टरशिवाय ओव्हरलोड वाहतूक करणार्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
