सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी आ. शशिकांत शिंदे यांनी पैसे भरले आहेत. त्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच पाटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटणकर यांनीही निवडणूक शाखेकडे पैसे भरुन मतदान यंत्रे तपासणीची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून आ. शशिकांत शिंदे यांनी यापूर्वीच मतदान यंत्रांच्या तपासणीसाठी सुमारे 6 लाख 50 हजार रुपये जिल्हा निवडणूक शाखेकडे भरले आहेत. तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब पाटील यांनी 4 लाख 72 हजार रुपये व पाटण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटणकर यांनी 1 लाख 41 हजार 600 रुपये निवडणूक शाखेकडे भरले आहेत. बाळासाहेबांना 10 मतदान केंद्रांवरील तर पाटणकरांना स्वत:च्या मतदारसंघातील कोणत्याही 3 मतदान केंद्रांवरील ईव्हीएम तसेच व्हीव्हीपॅट मशीन तपासणीची मागणी करता येणार आहे.
मतदान यंत्रे तपासणीची मुदत संपली आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी कोरेगाव, कराड उत्तर व पाटण विधानसभा मतदारसंघात पराभूत झालेल्या तीनही उमेदवारांनी मतदान यंत्रे तपासणीची मागणी केली असून त्यांच्या या मागणीचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयास सादर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्रे तपासणीबाबत भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (बेल) या कंपनीस कळवले जाणार आहे. त्यानंतर मतदान यंत्रे तपासणीचा कार्यक्रम लावला जाणार आहे. संबंधितांना त्याची पूर्वकल्पना देण्यात येणार आहे. मतदान यंत्रे तपासणीमध्ये ईव्हीएम मशीनमधील मेमरी चीप व व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या पडताळून पाहिल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने मतमोजणीनंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठेवली असून व्हीव्हीपॅटही जतन केली आहेत.
आक्षेप येण्याची शक्यता गृहित धरून निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून मतदान यंत्रांची काळजी घेतली जात आहे. सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे सातार्यातील जुन्या एमआयडीसी गोडाऊनला मतदारसंघनिहाय जमा करण्यात आली आहेत.
