मुंबई : भारतरत्न, घटनातज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादनासाठी आंबेडकरी अनुयायांचा जनसागर चैत्यभूमीवर उसळला आहे. चैत्यभूमीवर दर्शनासाठी हजारो लोक दादर आणि परळ रेल्वे स्थानकावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे दर्शनाची रांग प्रभादेवीपर्यंत गुरुवारी संध्याकाळी पोहोचली होती.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी ३ डिसेंबरपासून आंबेडकरी अनुयायी देशभरातून येत असतात. सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन असला तरी ३ डिसेंबरपासूनच हजारोंच्या संख्येने लोक दादर परिसरात जमू लागले आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार या राज्यातील अनुयायांसह महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात अनुयायी दाखल झाले आहेत.
या अनुयायांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने निवारा मंडप व्यवस्था केली गेली असली तरी या निवारा मंडपाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात अनुयायी थांबलेले आहेत. महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य कक्षात तसेच जे.जे. रुग्णालय, काही मोठ्या व्यवस्थापनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरोग्य सेवा कक्षातही गुरुवारी दिवसभरात सुमारे आठ ते नऊ हजार अनुयायांनी नोंदणी करून किरकोळ उपचार घेतले.
आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झाल्यानंतर लगेच चैत्यभूमी येथे दर्शनासाठी धाव घेतात. त्यामुळे गुरुवारीच दर्शनासाठीची रांग एक किलोमीटरपेक्षा अधिक मोठी होती. ‘बाबासाहेबांच्या दर्शनासाठी हजारो कोस प्रवास करूनही थकलो नाही, कारण आज बाबासाहेबांचे दर्शन होणार आहे’, अशी भावना नागपूर येथून आलेले अनिकेत कांबळे यांनी व्यक्त केली.
प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनावर समाधान
या ठिकाणी राज्य शासन, पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुयोग्य नियोजन केले असून अनुयायांसाठी मोठ्या प्रमाणात शासकीय तसेच समाजसेवी संस्थांनी भोजन व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि फिरती शौचालये जागोजागी तैनात करण्यात आली आहेत. समता सैनिक दलाचे स्वयंसेवक अहोरात्र अनुयायांसाठी मार्गदर्शन करीत असून त्यामुळे नियोजनबद्धरीत्या दर्शन होत असून कुठेही गोंधळ नसल्याचे मत तुळसाबाई सपकाळ यांनी व्यक्त केले.
