Explore

Search

April 19, 2025 8:02 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Kolhapur News : कोल्हापूर, सातारा पोलिसांना सर्वसाधारण विजेतेपद

५० व्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोह

कदमवाडी (कोल्हापूर) : शहीद अशोक कामटे साहेब क्रीडानगरीत सुरू असलेल्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर व सातारा संघाला विभागून देण्यात आले, तर महिलांचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर संघाने पटकाविले.

गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर पोलिस परेड मैदानावरील शहीद अशोक कामटे साहेब क्रीडानगरीत सुरू असलेल्या ५०व्या परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेचा बुधवारी समारोप झाला. या स्पर्धेत कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर शहर व ग्रामीण आणि पुणे ग्रामीण असे सहा पोलिस संघ दाखल झाले होते. या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी कोल्हापूर व सातारा पोलिस संघांत अटीतटीची लढत सुरू होती. एकूण स्पर्धेत पुरुष गटाचे गुण समसमान झाल्याने पुरुष गटाचे सर्वसाधारण विजेतेपद कोल्हापूर व सातारा संघाला विभागून दिले.

बुधवारी स्पर्धेच्या अंतिम दिवशी विजेत्या संघास पारितोषिक वितरण पुणे विभागीय आयुक्त डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते झाले, तर प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे, पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, सोलापूर शहरचे पोलिस आयुक्त एस.राजकुमार, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, साताराचे पोलिस अधीक्षक समीर शेख, पुणे ग्रामीणचे पंकज देशमुख व सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डाॅ.चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, क्रीडानगरी कोल्हापूर येथे राजर्षी शाहू महाराजांनी कुस्ती रुजवली व नावलौकिकास आणली. खाशाबा जाधव, स्वप्निल कुसाळे यांच्यासारखे ऑलिम्पिकवीर पोलिस दलातून निर्माण व्हावेत, तर सुनील फुलारी यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुका या भयमुक्त वातावरणात आणि शांततेत पार पाडण्याबरोबरच बंदोबस्त व नोकरी सांभाळून मिळविलेल्या यशाबद्दल सर्व पोलिस खेळाडूंचे अभिनंदन केले.

ही स्पर्धा पार पाडण्यासाठी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उपअधीक्षक पद्मा कदम, सुवर्णा पत्की, राखीव पोलिस निरीक्षक राजकुमार माने, नंदकुमार मोरे, संतोष डोके व क्रीडा विभागप्रमुख बाबासो दुकाने, धनंजय परब यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी, तर आभार अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी मानले.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy