Explore

Search

April 19, 2025 8:04 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Health News : जपूया नेत्रारोग्य

वास्तविक, डोळे निरोगी राहावेत आणि शेवटपर्यंत चांगले, कार्यक्षम राहावेत, यासाठी बालपणापासून पोषक आहार मिळणे आवश्यक असते. पूरक आणि पोषक आहारच इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही कार्यक्षम आणि निरोगी राखू शकतो. यासाठी अ जीवनसत्त्व आणिा प्रोटिन्सची आवश्यकता असते. हिरव्या पालेभाज्या, विशेषत: पालक, कढीलिंब तसेच चवळी, मूग यासारखी कडधान्ये, पपई, आंबा यासारखी फळे यामध्ये अ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. दूध, अंडी, मांस, मासे यांच्या आहारामुळेही अ जीवनसत्त्व मिळते. आवश्यक असलेल्या आहाराच्या अभावामुळे डोळ्यांचा टवटवीतपणा, सतेजपणा कमी होत जातो. आता तर वाढत्या स्क्रीनटाईममुळे लहान वयापासूनच डोळ्यांच्या आरोग्यावर दिवसागणीक प्रहार होत आहेत. अशातच बालपणापासून पोषक आहार मिळाला नाही, तर पुढे डोळ्यांच्या गंभीर तक्रारी सुरू होतात आणि त्यातून अंधत्वही येऊ शकतं.

गरोदर स्त्रियांमध्ये अंधूक मंद प्रकाशात कमी दिसण्याचे प्रमाण बरेच असते. याचे कारणही हेच आहे. तिच्यासाठी आणि तिच्या गर्भाच्या पोषणासाठी तिला जीवनसत्त्वयुक्त आहाराची जास्त प्रमाणात गरज भासत असते आणि अशा आहाराच्या अभावामुळे तिच्या दृष्टीवर परिणाम होत जातो. अंगावर पाजणार्‍या मातेला अ जीवनसत्त्व आणि प्रोटिन्स यांची जास्त प्रमाणात आवश्यकता असते. ते तिला मिळाले नाही तर आई आणि बाळ या दोघांच्याही द़ृष्टीवर परिणाम होईल. अंगावरच्या दुधासारखे कोणतेही दूध बालकांना पूर्णान्न होऊ शकत नाही. आईचे दूध बालकाची द़ृष्टी निरोगी बनविते हे प्रत्येक आईने आवर्जून लक्षात ठेवायला हवे. बाळंतपणाच्या पहिल्या दिवशी जे दूध येते ते काहीसे पिवळे आणि चिकट असते. हे दूध अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण असते. पहिल्या दिवशीचे दूध बाळाला अपायकारक असते, ही समजूत अत्यंत चुकीची आहे. उलट तेच दूध बाळासाठी योग्य असते.

आपल्या देशात डोळे येणे, चिकटणेसारखे संसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणावर आढळतात. याचे प्रमाण खेड्यात राहणार्‍या लोकांत आणखीनच जास्त असते. रोग्याने वापरलेले काजळ, सुरमा लावायची सळई, टॉवेल इत्यादी वस्तू कोणीही वापरल्यास त्यांनाही हे आजार होऊ शकतात. विशेषत: ग्रामीण भागातील स्त्रिया आपल्या मुलांचे तोंड, डोळे पुसताना नेहमीच आपल्या पदराचा वापर करतात. यामुळे पदराची घाण, जंतू मुलाच्या डोळ्यात जातात. ग्रामीण भागातील स्त्रियांना नेहमीच धूळ, धूर, माती या सर्वांच्या सहवासात राहावे लागते. त्यामुळे वेळीच काळजी घेतली नाही, तर त्यांचे डोळे निरोगी राहू शकत नाहीत. ग्रामीण जीवन असो अथवा शहरी, प्रत्येकाने डोळे ही आपली बहुमूल्य संपत्ती समजून त्याची जपणूक करणे गरजेचे आहे. डोळे निरोगी ठेवण्यासाठी जसा आहार महत्त्वाचा आहे तसा व्यायामही महत्त्वाचा आहे. उदा. डोळे वर-खाली, डावीकडे, उजवीकडे फिरवणे, सकाळच्या वेळी गवतावर फिरायला जाणे. गवतावर अनवाणी फिरण्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते.

डोळ्याच्या आरोग्यासाठी अ,ब, क आणि ड जीवनसत्त्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. अ जीवनसत्त्वासाठी मांस, अंडी, दूध, गाजर, मासे, केळी, खजूर या पदार्थांचे सेवन करावे. ब जीवनसत्त्वासाठी तृणधान्य, मोड आलेली कडधान्ये, अंडी, दूध, पालेभाज्या आदींचा आहारात वापर असावा. ब जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांची आग होते, लाल होतात, द़ृष्टी कमी होते. उजेड सहन होत नाही. मोसंबी, लिंबू, टोमॅटो, दूध, आवळे यात क जीवनसत्त्व मिळते. या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे डोळ्यांच्या निरनिराळ्या भागात रक्तस्राव होण्याचा धोका असतो. ड जीवनसत्त्वासाठी आहारात दूध, लोणी, कॉडलिव्हर ऑईल, अंडी याचा समावेश केला जातो. ड जीवनसत्त्वांच्या अभावामुळे मोतीबिंदू होण्याची शक्यता असते. मधुमेह, रक्तदाब आणि टी. बी. यासारखे रोगही द़ृष्टीवर परिणाम करीत असतात. या विकारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांनी आपले डोळेही वेळोवेळी तपासून घ्यावेत.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy