पत्रकाराचे होत आहे परिसरातून कौतुक
सातारा : सातारा येथील एका धाडसी पत्रकाराने आत्महत्या करणार्याचे प्राण वाचविले आहेत. त्यांच्या या धाडसी कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ‘बुलंद सातारा’चे उपसंपादक पलाश जवळकर हे आज दि. 9 रोजी 2.50 च्या सुमारास मित्रासमवेत फुटका तलाव येथून काही कामानिमित्त जात असताना एका व्यक्तीने आत्महत्त्या करण्यासाठी फुटका तलावात उडी मारली. त्यावेळी ही घटना पाहणारी एक महिला तेथे पोहोचून मदतीसाठी टाहो फोडत होती. हे दृश्य पाहताच पलाश जवळकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता मित्राकडे मोबाईल आणि पाकिट देत पाण्यामध्ये उडी मारली. दरम्यान, तेथे बघ्यांची गर्दीही झाली होती. मात्र, तिकडे लक्ष न देता पलाश जवळकर यांनी मोठ्या हिकमतीने संबंधिताला काठावर आणून त्याचे प्राण वाचवले. यानंतर संबंधिताची माहिती घेतली असता त्याचे नाव सतीश शिवलिंग स्वामी वय 54, रा. शाहूपुरी, सातारा असे असल्याचे समजले.
यानंतर संबंधिताच्या नातेवाईकांना कळवून याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. यानंतर संबंधिताला एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. पत्रकार पलाश जवळकर यांनी दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि समयसूचकतेबद्दल त्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
