७ जणांचा मृत्यू तर ४२ जण गंभीर जखमी
मुंबई : मुंबईतील कुर्ला एलबीएस रोडवर काल ९ डिसेंबर भीषण अपघाताची घटना घडली. सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने गर्दीच्या ठिकाणी घुसून पादचाऱ्यांना चिरडले आणि अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४२ जण गंभीर जखमी झालेत. या बसने १० वाहनांनाही धडक दिली. यामध्ये अनेक वाहनांचा चक्काचूर झाला. दरम्यान, बेस्ट बसचा चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला आज कुर्ला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (BEST) बस (रूट ३३२) च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस अनेक वाहने आणि पादचाऱ्यांना धडकली. तसेच ही हाऊसिंग सोसायटीच्या भिंतीवर आदळली. ही घटना रात्री ९:४५ च्या सुमारास घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, सदर बेस्ट बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात होती. यादरम्यान बसचे नियंत्रण सुटल्याने ती गजबजलेल्या ठिकाणी घुसली. यामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. भिंतीला आदळून अखेर बस थांबली.
आरोपी संजय मोरेला चालक म्हणून कामाला ठेवताना निकष पाळण्यात आले होते का? याची चौकशी होणार आहे. बेस्ट प्रशासनाशी बोलून याबाबत पोलीस पडताळणी करणार आहेत. तसेच बेस्टच्या काही अधिकाऱ्यांची आणि सबंधित कंत्राटदाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. याआधी संजय मोरे छोट्या मिनीबस आणि इतर गाड्या चालवत होता. पण त्याला मोठी बस चालवण्याचा अनुभव नसल्याची माहिती समोर आली आहे.
