बसचे चालक संजय मोरे यांचा दावा
मुंबई : गेल्या तीन दशकांपासून माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. कोणता अपघातही माझ्या हातून झाला नाही. बस अचानक अनियंत्रित कशी झाली, नेमके काय झाले, बसमध्येच बिघाड होता का, हे काहीच माहीत नसल्याचे चालक संजय मोरे पोलिसांना सांगत आहेत. फक्त एक दिवसाचेच प्रशिक्षण मिळाल्याचेही त्यांनी चौकशीत सांगितले.
सात जणांचा बळी घेणाऱ्या कुर्ला बस अपघातातील मुख्य आरोपी चालक संजय मोरे यांना २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. इलेक्ट्रिक बस हाताळणीचे त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील दोन दिवस संगणकावर इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीबाबत समजावून सांगण्यात आले व तिसऱ्या दिवशी त्यांच्या हाती बस सोपविण्यात आल्याचे समजते. परंतु, आपल्याला एकच दिवसाचे प्रशिक्षण मिळाल्याचे मोरे सांगतात. बस अनियंत्रित कशी झाली, हे माहीत नसल्याचे ते सांगत आहेत. आपल्या ३० वर्षांच्या कारकीर्दीत कोणाकडूनही तक्रार आली नसल्याचा मोरे यांचा दावा आहे. त्यानुसार पोलिस बेस्ट आणि आरटीओ यांच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत. प्रशिक्षणाबाबत नेमके नियम काय सांगतात, तसेच अन्य तांत्रिक बाबींबाबत बेस्ट आणि आरटीओकडे पत्रव्यवहार करून माहिती मागविणार असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
आरटीओच्या प्राथमिक तपासणीत बसमध्ये काहीच बिघाड नसून ब्रेकही व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले. आतापर्यंत २५ जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
नातेवाईक म्हणतात…
नेहमी रात्री ११च्या आत घरी येणारे संजय मोरे रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांना फोन करण्यास सुरुवात केली. अखेर, रात्री उशिरा एका पोलिसाने त्यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली. मोरे यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, त्यांच्याकडून वाहन चालवण्यात हलगर्जी होऊ शकत नाही, असा दावा त्यांच्या नातलगांनी केला. प्रशासनाने या अपघाताचा सखोल तपास करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. संजय मोरे १९८९ पासून वाहन चालवत आहेत. त्यांनी अनेक वाहने चालवली. त्यांचा परवाना स्वच्छ आहे, कुठलीच तक्रार नाही. त्यामुळे त्याच्याकडून कुठलीच चूक होऊ शकत नाही, असा दावा मोरेचे आत्येभाऊ मनोहर ओगले यांनी केला.
संजय मोरे यांनी १ डिसेंबरपासून इलेक्ट्रिक बस चालविण्यास सुरुवात केली. कुर्ला ते अंधेरी या मार्गावर ते ही बस चालवत होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास ते कामावर रुजू झाले. त्यानंतर चार वाजता इलेक्ट्रिक बसची पहिल्या फेरीला गेले. दोन फेरी व्यवस्थित झाल्यानंतर त्यांच्या ड्युटीचे ६ तास पूर्ण होत असल्याने त्यांना तिसऱ्या फेरीला साकीनाकापर्यंत फेरी मारण्यास सांगण्यात आले होते. ते आगारातून बस घेऊन बाहेर पडले आणि अवघ्या १५ सेकंदात होत्याचे नव्हते झाले.
इलेक्ट्रिक बस नवीन असल्याने प्रशिक्षणाबाबत नियमावली नाही. इलेक्ट्रिक बसमध्ये फक्त क्लच नसतो. नेहमीचा चालक दहा मिनिटांत इलेक्ट्रिक बस हाताळू शकतो, असे एका बेस्ट अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, अपघाताबाबत बेस्टची समिती तपास करत असल्याचे जनसंपर्क अधिकारी सुदास सावंत यांनी सांगितले.
