स्पेस एक्स चे संस्थापक आणि टेस्ला चे CEO एलन मस्क ४०० अब्ज डॉलर्स एवढी निव्वळ संपत्ती असणारे इतिहासातील पहिले व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, मस्क यांची संपत्ती ४४७ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीनंतर त्यांच्या संपत्तीत लक्षणीय वाढ झाली आहे.
या यादीत ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस एकूण २४९ अब्ज डॉलर्स संपत्तीसह दुसऱ्या स्थानी आहेत. तर मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग २२४ अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत.
मस्क यांच्या संपत्तीत झालेल्या वाढीचे श्रेय त्याची खासगी अंतराळ संशोधन कंपनी SpaceX च्या अंतर्गत शेअर विक्रीला दिले जात आहे. नुकत्याच झालेल्या इनसाइडर शेअर्सच्या विक्रीमध्ये SpaceX ने कर्मचारी आणि कंपनीच्या इनसाइडर्सकडून १.२५ अब्ज डॉलर्स किमतीचे शेअर्स खरेदी केले होते, असे ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या व्यवहारामुळे SpaceX चे मूल्य सुमारे ३५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढले. यामुळे जगातील सर्वात मौल्यवान खासगी स्टार्टअप म्हणून त्याचे स्थान मजबूत झाले आहे. मस्क यांच्याकडे या फर्मची ४२ टक्के हिस्सेदारी असल्याचे सांगितले जाते.
टेस्लाच्या शेअर्सने बुधवारी नवीन उच्चांक गाठल्यामुळे एलन मस्क यांच्या संपत्तीत वाढ झाली असल्याचेही दिसून आले.
