महायुतीकडे सत्ता आहे. त्यांच्याकडे प्रचंड काळापैसा आहे. हा लुटलेला पैसा आहे. त्यांच्याकडे पोलीस, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अशा यंत्रणा आहेत. त्यामुळे ते महाविकास आघाडीतील आमदार, नेते आमच्या संपर्कात आहेत, अशा प्रकारचे दावे करू शकतात. या यंत्रणा जर आमच्याकडे असत्या, तर अख्खा भाजपा आम्ही १५ मिनिटांत रिकामा केला असता, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.
महाविकास आघाडीचे काही आमदार, नेते महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. भाजपातील काही नेत्यांनी तसे दावे केले होते. यावर बोलताना संजय राऊतांनी भाजपाला सुनावले. ते पत्रकारांशी बोलत होते. तसेच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराला होत असलेल्या विलंबाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, खाते वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होत असताना कुणाला हृदयविकाराचा धक्का किंवा ब्रेन हॅमरेज झाले नाही म्हणजे मिळवले. रुग्णवाहिका तयार ठेवल्या पाहिजे. कारण अनेकांना धक्के बसायची शक्यता आहे, अशी खोचक टिपण्णी संजय राऊतांनी केली.
एकनाथ शिंदेंचा आनंद किंवा नाराजी दिल्लीसाठी आता संपली
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे नाराज आहेत, याबाबत संजय राऊतंना प्रश्न विचारण्यात आला. एकनाथ शिंदे नाराज जरी असले, तरी त्यांना कोण विचारत आहे. एकनाथ शिंदे यांचा आनंद किंवा त्यांची नाराजी दिल्लीसाठी आता संपलेली आहे. हे सगळे कळसुत्री बाहुली आहेत. अजित पवार असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे आता गुलाम आहेत. गुलामांनी बलिदानाची तयारी ठेवली पाहिजे, ती यांच्याकडे नाही. ते डरपोक लोक आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
…तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहे
बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊन दाखवा, निकालाची मतमोजणी सुरू होताच अर्धे भाजपावाले देश सोडून पळून गेलेले असतील. यात अनेक मोठे नेते असू शकतात. या गोष्टी आम्हाला सांगू नका. आम्ही कुणालाही घाबरत नाही. पक्षासाठी आम्ही तुरुंगवास भोगले, मारामाऱ्या केल्या आहेत, आता आम्ही सभ्य झालो आहोत. जोपर्यंत आम्ही सभ्य आहोत, तोपर्यंत आम्ही सभ्यतेने राहू. महाराष्ट्राच्या मूळावर येण्याचा प्रयत्न केला, तर पुन्हा १०५ हुतात्मे देण्याची तयारी फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आहे आणि त्या १०५ हुतात्म्यातील पहिला हुतात्मा संजय राऊत असेल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
