Explore

Search

April 19, 2025 10:21 am

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Pune News : ‘पीडी’ ग्राहकांच्या वीजबिल थकबाकीमुक्ती

‘अभय’ योजनेला उरले आता १४ दिवस

पुणे : वीजबिल थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित (पर्मनंट डिस्कनेक्टेड) असलेल्या ग्राहकांना केवळ मूळ थकबाकीच्या रकमेचा एकरकमी किंवा सहा हप्त्यांत भरणा करून थकबाकीमुक्ती व पुनर्वीजजोडणीची संधी महावितरण अभय योजनेतून उपलब्ध झाली आहे. या योजनेला केवळ १४ दिवस उरले असून आतापर्यंत पुणे प्रादेशिक विभागातील २३ हजार ७७९ लघु व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांनी सहभाग नोंदविला आहे. त्यातील २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

थकीत वीजबिलांमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने अभय योजना सुरु केली आहे. कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित लघु व उच्चदाब वर्गवारीतील सर्व घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांसाठी ही योजना आहे. यामध्ये केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकाराची (दंड) रक्कम माफ होणार आहे. तसेच मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना आणखी १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना आणखी ५ टक्के सूट मिळत आहे. यासोबतच मूळ थकबाकीची सुरवातीला ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. महावितरण अभय योजनेची मुदत येत्या दि. ३१ डिसेंबरला संपणार आहे.

अभय योजनेमध्ये पुणे प्रादेशिक विभागात आतापर्यंत सहभागी २० हजार ५४६ वीजग्राहकांनी ३० कोटी २० लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे. यात पुणे जिल्ह्यात ८६२६ ग्राहकांनी १८ कोटी ७६ लाख, सातारा जिल्ह्यात ९९४ ग्राहकांनी १ कोटी ५१ लाख, सोलापूर जिल्ह्यात ३३२८ ग्राहकांनी २ कोटी ८८ लाख, कोल्हापूर जिल्ह्यात ४०४३ ग्राहकांनी ४ कोटी ७४ लाख आणि सांगली जिल्ह्यातील ३५५५ ग्राहकांनी २ कोटी ३१ लाख रुपयांच्या मूळ थकबाकीचा भरणा केला आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलल्यानंतर देखील नवीन जागामालक किंवा ताबेदारांना थकबाकीची रक्कम भरावी लागेल. त्यामुळे जागा वापरात असो किंवा नसो, पण त्या जागेवर वीजबिलांची थकबाकी राहणार असल्यामुळे या थकबाकीतून मुक्त होण्याची संधी आहे. त्यामुळेच सध्या विजेची गरज नसतानाही ११ हजार ६५७ ग्राहकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे तर ७९२० ग्राहकांनी पुनर्विजजोडणी आणि ४२०२ ग्राहकांनी नवीन वीजजोडणीची मागणी केली आहे. कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित असलेल्या इतरही ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. महावितरणच्या फ्रेंचायझी क्षेत्रातील ग्राहक देखील या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy