Explore

Search

April 19, 2025 6:09 pm

IAS Coaching
लेटेस्ट न्यूज़

Satara News : गोंदवलेत ‘श्रीं’च्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा

दहिवडी : ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा 111 वा पुण्यतिथी महोत्सव येथील समाधी मंदिरात उत्साहात सुरू असून यानिमित्ताने ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक सकाळी मंदिरातून सुरू होऊन गोंदवले गावातून ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली. ग्रामपंचायतीसमोर सरपंच जयप्रकाश कट्टे व त्यांच्या सहकार्‍यांनी पालखीचे स्वागत केले.

श्री क्षेत्र गोंदवले येथे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा पुण्यतिथी सोहळा सुरु असून यानिमित्ताने समाधी मंदिरात सकाळी भाविकांची पालखी मिरवणुकीची तयारी सुरू असते. चांदीच्या पालखीला हार फुलांनी सजवण्यात आले होते. पालखी घेण्यासाठी भालदार, चोपदार देखील तयार होते. सकाळी नऊच्या सुमारास मंदिरात ‘श्रीं’च्या समाधी व पादुकांचे विश्वस्तांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर आरती होताच श्रीराम नामाच्या गजरात मानकर्‍यांच्या हस्ते पादुका व प्रतिमा चांदीच्या पालखीत विराजमान करण्यात आल्या. यावेळी मंदिर परिसर चैतन्यमय झाला होता. चोपदारांनी ‘श्री अनंत कोटी ब्रह्मांडनायक…’चा जयघोष करताच पालखी समाधी मंदिरातून बाहेर निघाली. पाटकर्‍यांनी पालखीवाहकांच्या पायांवर व पाटांवर पाण्याने स्नान घातले. त्यानंतर मोठ्या उत्साहात ही मिरवणूक ग्रामप्रदक्षिणेसाठी निघाली. पालखीसमोर अश्व आणि पताकाधारी भाविक तल्लीन होऊन नाचत होते, तर टाळकरी भजनात दंग झाले होते.

श्रीराम नामाच्या जयघोषात समाधी मंदिरातून निघालेली पालखी मिरवणूक गोंदवल्याच्या मुख्य रस्त्यावरून हळूहळू पुढे सरकत होती. गावातील सर्वच मंदिरांत आरती करुन पालखी सोहळा पुढे जात होता. गावातील थोरले श्रीराम मंदिराजवळ पालखी आल्यानंतर सरपंच जयप्रकाश कट्टे यांनी ‘श्रीं’च्या पादुका व प्रतिमेचे सपत्नीक दर्शन घेतले. ग्रामपंचायतीच्या वतीने ‘श्रीं’ च्या पालखीला पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी अमोल पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेले भाविक हा सोहळा अनुभवण्यासाठी पालखी सोहळ्यात सहभागी होतात. पालखीच्या पुढे पाटांच्या पायघड्या घालण्याची प्रथा ही खूप पूर्वी पासून आहे.

गोंदवलेसह अनेक गावचे ग्रामस्थ श्री. महाराजांच्या पालखी पुढे पाटांच्या पायघड्या घालण्याची सेवा आनंदाने करतात. ग्रामप्रदक्षिणेनंतर पुन्हा पालखी सोहळा समाधी मंदिरात आला. त्यावेळी सुवासिनींनी पालखीतील ‘श्रीं’च्या पादुका व प्रतिमेचे औक्षण केले. श्रीरामाच्या जयघोषात पुन्हा पालखी मुख्य मंदिरात विसावली आणि ‘श्रीं’च्या पादुका पुन्हा समाधी मंदिरात स्थानापन्न झाल्या. सलग दहा दिवस हा सोहळा भाविकांना अनुभवता येतो.

Rayat Darpan
Author: Rayat Darpan

Leave a Comment

Live Tv
Advertisement
लाइव क्रिकेट स्कोर
Infoverse Academy